Rekha Gupta Husband’s Photos with PWD DUSIB Officers Meeting : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या पतीमुळे दिल्लीच्या राजकारणात मोठा गोंधळ चालू आहे. रेखा गुप्ता यांचे पती मनीष गुप्ता सार्वजनिक बांधकाम (PWD) व दिल्ली शहरी निवारा सुधार मंडळाच्या (DUSIB) अधिकाऱ्यांच्या बैठका घेत असल्याचा दावा आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी केला आहे. तसेच त्यांनी मनीष गुप्ता यांचे काही कथित फोटो देखील समाजमाध्यमांवर शेअर केले आहेत. या फोटोंवरून दिल्लीचं राजकारण तापलं आहे. या फोटोंमध्ये पीडब्ल्यूडी व डीयूएसआयबीचे अधिकारी मनीष गुप्ता यांच्याशी बातचीत करत असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, आम आदमी पार्टीचे संयोजक सौरभ भारद्वाज यांनी हे फोटो पाहून रेखा गुप्ता यांचा ‘रबर स्टॅम्प मुख्यमंत्री’ असा उल्लेख केला आहे. तसेच, भाजपाने त्यांच्या मोठ्या नेत्यांना बाजूला सारून रबर स्टॅम्प मुख्यमंत्र्याची नेमणूक केली असल्याचं वक्तव्य केलं आहे.

ही दिल्ली आहे, फुलेरा पंचायत नाही : आप

सौरभ भारद्वाज म्हणाले, रेखा गुप्ता यांनी स्वतःच सिद्ध केलं आहे की त्या केवळ रबर स्टॅम्प आहेत आणि सगळी कामे त्यांचे पती मनीष गुप्ता करत आहेत. परंतु, मला सर्वांना आठवण करून द्यायची आहे की रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, त्यांच्या पतीने नाही. दिल्लीत हा असला कारभार चालणार नाही. ही दिल्ली आहे, फुलेरा पंचायत नाही.

भाजपाकडून आपला प्रत्युत्तर

दरम्यान, दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी भारद्वाज यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, केजरीवाल सरकारमध्ये सनदी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीला मॅडम सीएम म्हणून हाक मारायची, ते विसरलात का? त्यानंतर आतिशी मार्लेना मुख्यमंत्री झाल्यानंतर भूपेंद्र चौबे मुख्यमंत्री कार्यालयात का फिरायचे? ते देखील भारद्वाज यांनी सांगावं. सध्या आतिशी व सौरभ भारद्वाज या दोघांमध्ये आम आदमी पार्टीवर नियंत्रण मिळवण्याची स्पर्धा चालू आहे.

आतिशी यांची रेखा गुप्ता यांच्यावर टीका

दरम्यान, रेखा गुप्ता यांच्या पतीचे सनदी अधिकाऱ्यांबरोबर बातचीत करतानाचे फोटो शेअर करत आतिशी मार्लेना यांनी म्हटलं आहे की “मुख्यमंत्री रेखा गुप्ता दिल्ली सांभाळण्याइतक्या सक्षम नाहीत का? आता त्यांच्या पतीला दिल्लीची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे का?”