अमेठीत काँग्रेसवर चौफेर टीका करणारे आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास हे नव्या जन्मलेल्या ‘आप’चे लहान बाळ असून ते अशा प्रकारची बालिश मजेदार वक्तव्ये करत असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह म्हणाले.
तसेच अमेठीतील विश्वास यांचे भाषण हे ‘आप’मधले कुमार विश्वास नसून कुमार ‘बकवास’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशी टीका करणारे ट्विट दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर केले आहे.
कुमार विश्वास यांना सद्यस्थितीची जाण नाही. त्यांनी केलेल्या टीकांमध्ये बालिशपणा आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाने विश्वास यांच्या बकवास वक्तव्यांवर नियंत्रण ठेवले पाहिजे असा दिग्विजय यांनी ‘आप’ला सल्लाही देऊ केला आहे.
कुमार विश्वास यांनी अमेठीतील सभेत अमेठी हा वेगळा देश आहे काय? येथे येण्यासाठी वेगळी परवानगी लागते? असे विचारत त्यांनी निदर्शकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांनी अमेठीच्या प्रश्नावर दहा वर्षांमध्ये कधी तोंड उघडले आहे काय? राजपुत्राऐवजी आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीला निवडण्याचे आवाहन त्यांनी केले. सोनियांचा महाराणी असा वारंवार उल्लेख करत, त्यांचे जावई रॉबर्ट वधेरा यांच्यावरही त्यांनी शरसंधान साधले होते. त्यांनतर दिग्विजय यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून विश्वास यांची वक्तव्ये बालिश असल्याची टीका केली आहे.
Excitement of #AAP newbies is funny but they should restrain lunatic comments of Kumar Bakwaas. This man clearly overestimates himself!
— DigvijaySingh (@DigvijaySingh__) January 13, 2014