दिल्ली विधानसभेत आपली शक्ती सिद्ध केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने आता येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपले सामथ्र्य अजमावण्याचे ठरविले आह़े  लोकसभेच्या निवडणुका २० राज्यांतून लढविण्याचा आणि त्यातही उत्तर प्रदेशमधील सर्व ८० जागा लढविण्याचा निर्णय ‘आप’ने सोमवारी घोषित केला़  तसेच राहुल गांधी यांच्याविरोधात अमेठी मतदारसंघातून कुमार विश्वास यांना उमेदवारी देण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आह़े
‘आप’चे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंग यांनी येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली़  सोनिया गांधी, मुलायमसिंग यांसारख्या बडय़ा नेत्यांविरोधातील ‘आप’चे उमेदवार लवकरच ठरविण्यात येणार आहेत़  १५ फेब्रुवारीपर्यंत उमेदवार यादी निश्चित करण्याचा आमचा प्रयत्न असून ज्यांना ‘आप’च्या तिकिटावर निवडणूक लढवायची आहे त्यांनी १५ जानेवारीपर्यंत अर्ज करावा, असे आवाहनही सिंग यांनी या वेळी केल़े  मात्र ज्यांना उमेदवारी हवी आहे, त्यांच्या नावाला त्यांच्या मतदारसंघातील किमान १०० जणांनी पाठिंबा
द्यायला हवा, अशी अटही त्यांनी सांगितली़  
उमेदवारीसाठी करण्यात आलेल्या अर्जाची जिल्हा आणि राज्य पातळीवर छाननी करण्यात येईल आणि त्यानंतरच त्यांचा अंतिम विचार होईल़  पक्षाकडून राष्ट्रीय पातळीवरील एक वचननामा प्रसिद्ध करण्यात येईलच, पण त्याव्यतिरिक्त स्थानिक पातळीवरील समस्यांबाबतचा आणखी एक वचननामा जनतेतूनच तयार करण्यात येणार आहे, अशीही माहिती सिंग यांनी दिली़
मुलायमसिंग, रामविलास पासवान, फारुख अब्दुल्ला, ममता बॅनर्जी, मायावती आणि इतर काही नेते स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवितात़  मात्र ते काही काळापूर्वी भाजपसोबत होते, हे वास्तव आह़े  आज ते धर्मनिरपेक्षतेचा बुरखा घेऊन काँग्रेससोबत आहेत, असा टोला त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना लगावला़  तसेच आमदार-खासदार फंड मोहल्ला आणि ग्रामसभांकडे वळविण्यास ‘आप’चा पाठिंबा असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितल़े
उत्तर प्रदेशात धर्म आणि जातीच्या नावावर होणारे राजकारण हे प्रमुख आव्हान असल्याचे मान्य करीत सिंग म्हणाले की, आम्ही जनतेचे लक्ष या मुद्दय़ांकडून स्थानिक प्रश्नांकडे वळविण्याचा प्रयत्न करू  दिल्ली निवडणुकांनंतर जात-धर्माच्या राजकारणाकडे पाहण्याचा जनतेचा दृष्टिकोन वेगाने बदलत असल्याचा दावाही त्यांनी केला़

अमेठीमध्ये शक्तिप्रदर्शन करणार
आम आदमी पार्टीने राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघातच जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू केली आहे.
अमेठीमधून कुमार विश्वास यांना राहुल गांधी यांच्याविरोधात लढविण्याची शक्यता आह़े त्यामुळे अमेठीमध्ये वातावरणनिर्मितीसाठी ‘आप’ने १२ जानेवारीला तेथे एक मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी सध्या जोरदार तयारी सुरू असून नागरिकांचा व विशेषत: तरुणांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती या पक्षाचे जिल्हा समन्वयक हनुमान सिंह यांनी दिली. या मतदारसंघात बेरोजगारी तसेच अन्य स्थानिक समस्या असून आमच्या पक्षाकडे एक पर्याय म्हणून लोक पाहत आहेत, या निवडणुकीनंतर गांधी परिवाराची येथील घराणेशाही संपुष्टात येईल, असा दावाही त्यांनी केला.

Story img Loader