Punjab CM Replace: दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव आणि त्यातही ‘आप’चे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल पराभूत झाल्यानंतर पक्षासमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. त्यातच पंजाबमधील ‘आप’ सरकारबद्दल अनेक वावड्या उठत आहेत. पंजाबचे अनेक आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा आरोप केला जात आहे. तर काही ठिकाणी भगवंत मान यांना हटविले जाणार अशी चर्चा सुरू आहे. यावर आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत यांनीच खुलासा केला आहे. दिल्ली येथे आज अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत पंजाबमधील सर्व आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना भगवंत मान यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीमधील मुख्यमंत्री भगवंत मान यांचे निवासस्थान असलेल्या कपूरथाला हाऊसमध्ये आम आदमी पक्षाची बैठक संपन्न झाली. या बैठकीपूर्वी भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने दावा केला होता की, अरविंद केजरीवाल हे भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवू इच्छित आहेत. राजौरी गार्डन येथील भाजपाचे आमदार मजिंदर सिंग सिरसा यांनी हा दावा केला की, भगवंत मान अकार्यक्षम मुख्यमंत्री असल्याचा ठपका ठेवून त्यांना बाजूला केले जाईल.

भाजपाचे नेते मजिंदर सिंग सिरसा यांनी एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ते म्हणाले, “आप पक्ष दिल्लीत पराभूत झाला, पण बैठक पंजाबच्या आमदारांची बोलावली आहे. कारण मासा जसा पाण्याबाहेर राहू शकत नाही, तसे केजरीवाल यांचे झाले असून त्यांना सत्तेशिवाय राहता येत नाही. त्यांना उंची जीवनशैलीची सवय झाली आहे. त्यामुळेच ते पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी बसण्याचे स्वप्न पाहत आहेत.”

सिरसा पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री भगवंत मान हे भ्रष्टाचार, अमली पदार्थांची तस्करी रोखू शकले नाहीत, असा आरोप करत त्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न केला जात आहे. भगवंत मान अपयशी झाले, हे जरी खरे असले तरी अरविंद केजरीवाल सहजासहजी पंजाबचे मुख्यमंत्री होतील, असे होऊ शकणार नाही.

मुख्यमंत्री भगवंत मान यांना जेव्हा या दाव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले, त्यांना जे बोलायचे ते बोलू द्या. आम्ही जी आश्वासने दिली होती, ते पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

तसेच काँग्रेसचे नेते प्रताप सिंह बाजवा यांच्या आरोपालाही मान यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, आपचे २० आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला. हा दावा ते गेल्या तीन वर्षांपासून करत आहेत. पण मी त्यांना विचारतो की, सलग तिसऱ्यांदा तुमचे दिल्लीत किती आमदार निवडून आले. त्याचा आकडा आधी सांगा.

पंजाबच्या विधानसभेत ११७ आमदारांपैकी ९३ ‘आप’चे आमदार आहेत. तर काँग्रेसकडे १६ आमदार आहेत.