पंजाब विधानसभा निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट होऊ लागले असून आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं असल्यायचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षानं जल्लोष सुरू केला असून नवज्योत सिंग सिद्धू यांनी पक्षाचा पराभव मान्य देखील केला आहे. या पार्श्वभूमीवर पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी हे देखील पराभूत झाल्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मात्र, त्यांना कुणी पराभूत केलं, यासंदर्भात आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी खुलासा केला आणि त्या उमेदवाराची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्या उमेदवाराचं नाव आहे लाभसिंग उगोके!
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनाच काँग्रेसनं पुढील मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. मात्र, त्यांचा देखील पराभव झाला आहे. भदौरमधून लाभसिंग उगोके यांनी चरणजीतसिंग चन्नी यांचा पराभव केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची चर्चा सुरू असताना आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील विजयानंतर केलेल्या भाषणात उगोके यांच्याविषयी माहिती दिली आणि पंजाबमधअये ‘आम आदमी’ची खरी ताकद दिसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
“चन्नींचा पराभव कुणी केलाय माहितीये का?”
अरविंद केजरीवाल यांनी आपल्या भाषणात उगोके यांची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितली आहे. “तुम्हाला वाटेल, एक सामान्य व्यक्ती काय करू शकते? तुम्हाला माहिती आहे का की चरणजीत सिंग चन्नी यांना कुणी हरवलंय? भदौरच्या लाभसिंग उगोकेनी हरवलंय. लाभसिंग उगोके मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात नोकरी करतात. त्यांच्या आई सरकारी शाळेत सफाई कर्मचाऱ्याची काम करतात. त्यांचे वडील शेतात मजुरी करतात. अशा व्यक्तीने चरणजीतसिंग चन्नी यांना निवडणुकीत हरवलं आहे”, असं केजरीवाल यांनी सांगितलं.
सिद्धूंना सामान्य महिला कार्यकर्तीनं हरवलं!
दरम्यान, नवज्योत सिंग सिद्धू यांचा पराभव करणाऱ्या जीवनज्योत कौर यांच्याविषयीही केजरीवाल यांनी यावेळी सांगितलं. “नवज्योतसिंग सिद्धू यांना आमची सामान्य कार्यकर्ती जीवनज्योत कौर यांनी हरवलं आहे. त्यांनी मजिठिया यांनाही हरवलं आहे. सामान्य माणसात मोठी ताकद आहे. मी नेहमीच सांगतो, सामान्य माणसाला आव्हान देऊ नका, नाहीतर देशात मोठमोठ्या क्रांत्या होतील. आप कुठला पक्ष नसून ती एक क्रांती आहे. सगळ्यांनी आम आदमी पार्टीमध्ये सहभागी व्हा”, असं आवाहन देखील केजरीवाल यांनी यावेळी केलं.