पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने मोठा विजय मिळवत सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता दिल्लीत महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या बद्दल भाजपावर हल्ला चढवला आणि खुलं आव्हान दिलंय. भाजपाने वेळेवर या निवडणुका घेतल्या आणि त्या जिंकल्या तर आम आदमी पार्टी राजकारण सोडेल, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपाला आव्हान देताना दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, ‘हिंमत असेल तर निवडणुका वेळेवर घ्या आणि जिंकून दाखवा, तुम्ही निवडणुका जिंकल्या तर आम्ही राजकारण सोडू. भाजपा स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवतो पण त्यांना दिल्लीतील एका छोट्या पक्षाची भीती वाटते. तुम्ही दिल्लीच्या निवडणुकीला घाबरलात, तुमच्यात हिंमत नाही,’ अशी टीका टीका केजरीवाल यांनी केली.

दिल्ली महापालिकेची निवडणूक पुढे ढकलणे हा इंग्रजांना देशातून हाकलून देशात लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा अपमान आहे. आज ते पराभवाच्या भीतीने दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलत आहेत, उद्या ते राज्यांच्या आणि देशाच्या निवडणुका पुढे ढकलणार आहेत. दिल्लीतील तिन्ही कॉर्पोरेशन एकत्र येणार आहे म्हणून निवडणुका भाजपा पुढे ढकलत आहेत, फक्त यासाठी निवडणुका पुढे ढकलता येतात का? उद्या ते गुजरात गमावत असतील म्हणून ते गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र करत आहेत, अशी काहीतरी कारणं देऊन लोकसभा निवडणुका टाळता येतील का?, असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap will leave politics if bjp wins mcd polls says arvind kejriwal hrc