दिल्ली विधानसभा निवडणुकीतील नेत्रदीपक विजयामुळे उत्साहित झालेला आम आदमी पक्ष कुठल्याही प्रादेशिक पक्षाशी ‘सोयीस्कर आघाडी’ न करता येत्या पाच वर्षांत देशातील किमान चार मोठय़ा राज्यांमध्ये महत्त्वाची राजकीय शक्ती म्हणून ओळखला जाण्याची योजना आखत आहे.
आगामी काळात ‘आप’ची राष्ट्रीय राजकारणात प्रमुख शक्ती म्हणून उदयाला येण्याची इच्छा असून त्यासाठी पक्ष मध्यमकालीन व दीर्घकालीन उद्दिष्टे निश्चित करण्याच्या तयारीत असल्याचे पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी सांगितले.‘आप’ हा प्रादेशिक पक्ष नसून, भविष्यकाळात राष्ट्रीय पर्याय होण्याची आमची इच्छा आहे. त्यामुळेच आम्ही जाणीवपूर्वक दिल्लीची निवड केली. येत्या ३ ते ५ वर्षांत आम्ही दिल्ली व पंजाबशिवाय अधिक राज्यांमध्ये सक्षम होऊ इच्छितो, असे यादव म्हणाले. अशा राज्यांमध्ये २० टक्क्यांहून अधिक मते मिळवण्याचे पक्षाचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंजाबमध्ये ‘आप’ला गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत ४ जागा मिळाल्या, तेथे लक्ष केंद्रित करून २०१७ सालच्या विधानसभा निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याचे पक्षाने ठरवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वीज बिलांच्या मुद्दय़ांवर मोदींची आपवर टीका
वीज बिले कमी करण्याच्या आम आदमी पक्षाच्या भूमिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली आहे. विजेबाबत बाहेरील राज्यांवर जे अवलंबून आहेत त्यांनी अशी आश्वासने देणे आश्चर्यकारक आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी आपला टोला लगावला आहे.प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्ष मोफत विजेचे आश्वासन देतात. लोकांनीच याचा विचार करावा असे मोदींनी अपारंपरिक ऊर्जाविषयक परिषदेत स्पष्ट केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap will spread in four states yogendra yadav