पीटीआय, चंडीगड : पंजाबमधील जालंधर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आम आदमी पक्षाने जिंकली आहे. विधानसभांसाठी चार ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकांत उत्तर प्रदेशात दोन्ही जागांवर भाजपच्या मित्रपक्षाने विजय मिळवला. ओडिशातील पोटनिवडणुकीत बिजू जनता दलाने जागा कायम राखली असून, मेघालयमधील पोटनिवडणुकीत यूडीपीचा उमेदवार विजयी झाला आहे. या सर्व जागांचे निकाल मतमोजणीनंतर शनिवारी जाहीर झाले.
जालंधर लोकसभा मतदारसंघात ‘आप’चे उमेदवार सुशील रिंकू यांनी त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी व काँग्रेस उमेदवार करमजित कौर चौधरी यांचा ५८,६९१ मतांनी पराभव केला. रिंकू यांना ३,०२,२७९ मते, तर चौधरी यांना २,४३,५८८ मते मिळाली. बसपचा पाठिंबा असलेले शिरोमणी अकाली दलाचे उमेदवार १ लाख ५८ हजार मतांसह तिसऱ्या, तर भाजपचे इंदर इक्बालसिंग अटवाल हे १ लाख ३४ हजार मतांसह चौथ्या स्थानावर राहिले. ही जागा ‘आप’ने काँग्रेसकडून हिसकावून घेतली.
उत्तर प्रदेशातील छानबे (राखीव) व सुआर या दोन्ही मतदारसंघांत भाजपचा मित्रपक्ष असलेल्या अपना दल (सोनेलाल) या पक्षाने विजय मिळवला. छानबे मतदारसंघात रिंकी कोल यांनी समाजवादी पक्षाचे कीर्ती कोल यांना ९,५८७ मतांनी हरवले. रिंकी कोल यांना ७६,२०३, तर कीर्ती कोल यांना ६६,६१६ मते मिळाली. काँग्रेसचे अजय कुमार यांना ‘नोटा’ला मिळालेल्या (१.५१ टक्के) मतांपेक्षा थोडी जास्त, म्हणजे फक्त १.५६ टक्के मते मिळवता आली.
- सुआर मतदारसंघात अपना दलाच्या शफीक अहमद अन्सारी यांचा ८,७२४ इतक्या मताधिक्याने विजय झाला. त्यांना ६८,६३० मते, तर समाजवादी पक्षाच्या अनुराधा चौहान यांना ५९,९०६ मते मिळाली.
- ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दलाने झारसुगुडा विधानसभा पोटनिवडणुकीत जागा कायम राखली. या पक्षाच्या उमेदवार दीपाली दास यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे टंकधर त्रिपाठी यांचा ४८,७२१ मतांनी पराभव केला.
- मेघालयमध्ये युनायटेड डेमॉक्रॅटिक पार्टीचे (यूडीपी) उमेदवार सिंशर कुपर रॉय थाबाह यांनी सोहिआँग मतदारसंघात नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) सामलिन मालंगिआंग यांचा ३४०० मतांनी पराभव केला.