सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या मुद्दय़ांना स्पर्श करीत आम आदमी पक्षाने नागरिकांना मोठय़ा संख्येने राजकारणाकडे ओढले आहे. म्हणूनच, या पक्षाचा उदय ही ‘प्रस्थापित राजकीय संस्थां’च्या अस्ताची सुरुवात आहे असे मला वाटते, अशी प्रतिक्रिया नोबेल पारितोषिक विजेते ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी व्यक्त केली.
केजरीवाल यांचा प्रयत्न अतिशय स्तुत्य असून नागरिकांच्या गरजांची आणि मूलभूत प्रश्नांची जाणीव असेल तर निवडणुका जिंकता येतात, हा संदेशच जणू या निकालांमधून मिळतो असेही ते म्हणाले. मात्र केजरीवाल यांचे कौतुक करणाऱ्या सेन यांनी अण्णांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. एका व्यवस्थेवर टीका करीत बसायचे, पण आत शिरून त्यात बदल करायचा नाही, ही दुटप्पी भूमिका आहे, अशी टीका सेन यांनी केली.
समलिंगी संबंधांविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकालही आपल्याला आवडला नसल्याचे सेन म्हणाले. देशात लोकशाही आहे, काही लोकांना काही सुविधा मिळतात, काहींपर्यंत त्या पोहोचू शकत नाहीत.
मूर्ती आणि नीलेकणी यांच्याकडूनही कौतुक
सत्तेत शिरण्यासाठी केवळ पैशाचीच गरज असते या समीकरणाला छेद देत आम आदमी पक्षाने झंझावाती पदार्पण केले आहे, अशा शब्दांत इन्फोसिसचे अध्यक्ष नारायण मूर्ती यांनी केजरीवाल यांच्या निवडणुकीतील यशाचा गौरव केला. सामान्य माणसे निवडणुका जिंकू शकतात हा आत्मविश्वास या पक्षाच्या विजयाने जनतेला मिळाला आहे. असेही ते पुढे म्हणाले.
एकेकाळचे मूर्ती यांचे सहकारी नंदन नीलेकणी आणि अरुण शौरी यांनीही ‘आप’चा उदय ही इतर पक्षांसाठी धोक्याची घंटा असल्याचे मत नोंदवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा