दिल्लीच्या महापौर पदी पुन्हा एकदा आपच्या डॉ. शैली ओबेरॉय विराजमान झाल्या आहेत. तर, उपमहापौर म्हणून आले मोहम्मद इक्बाल यांची निवड झाली आहे. मतदान प्रक्रियेच्या काही मिनिटेआधीच भाजापाने या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे आपचे उमेदवार यावेळी बिनविरोध निवडून आले. स्थायी समिती गठीत करण्यास आपने मनाई केली असून यामुळे लोकांचे प्रश्न प्रलंबित राहत असल्याचे कारण देत भाजपाने निवडणुकीतून माघार घेतली.
दिल्लीत २२ फेब्रुवारी रोजी महापौर पदाच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी डॉ.शैली ओबेरॉय मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. मात्र, त्यांचा कार्यकाळ ३१ मार्च रोजीच संपुष्टात आला. दिल्ली महानगरपालिका अधिनियम १८५७ नुसार नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच एप्रिल महिन्यात नवा महापौर निवडला जातो. त्यानुसार, दिल्लीत पुन्हा महापौर पदाच्या निवडणुका लागल्या. या निवडणुकीत भाजपा आणि आपने दोघांनीही उमेदवार जाहीर केले. आपकडून डॉ. शैली ओबेरॉय यांना नामांकन मिळालं, तर भाजपाकडून शिखा राय यांना उमेदवारी मिळाली. तसंच, उपमहापौर पदासाठी आपकडून आले मोहम्मद इक्बाल आणि भाजपाकडून सोनी पांडेय यांनी उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, या निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू होण्याआधीच भाजपाने या निवडणुकीतून माघार घेतली आणि आपचे डॉ.शैली ओबेरॉय आणि आले मोहम्मद इक्बाल यांची महापौर आणि उपमहापौर पदी अनुक्रमे बिनविरोध निवड झाली आहे.
नियम काय सांगतो?
पाच वर्षांच्या कार्यकाळात दिल्लीत दरवर्षी महापौर पद बदलले जाते. त्यानुसार, पहिले वर्ष महिलांसाठी राखीव ठेवले जाते. तर, दुसरे वर्ष खुल्या प्रवर्गासाठी, तिसरे वर्ष राखीव प्रवर्गासाठी, तर शेवटची दोन वर्षे पुन्हा खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात येते. प्रत्येक नव्या आर्थिक वर्षांत दिल्लीला नवा महापौर मिळतो. तसंच, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर महिन्याभरात महापौर पदासाठी निवडणूक घेतली जाते. त्यानुसार, डिसेंबरमध्ये दिल्लीत महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे महापौर पदासाठी निवडणूक जाहीर होताच सत्ताधारी आणि विरोधक सभागृहातच आक्रमक होत होते. परिणामी तीनवेळा ही मतदानप्रक्रिया तहकूब करावी लागली. अखेर, २२ फेब्रुवारी रोजी दिल्लीत महापौर पदासाठी निवडणूक पार पडली. यावेळी आपच्या डॉ. शैली ओबेरॉय यांनी भाजपाच्या रेखा गुप्ता यांचा पराभव केला. परंतु, दिल्ली नगरपरिषद अधिनियम १९५७ नुसार, डॉ.शैली ओबेरॉय यांचं महापौर पद अवघ्या दीड महिन्यांत म्हणजे ३१ मार्च रोजी संपुष्टात आलं. त्यामुळे पुन्हा निवडणुका घ्याव्या लागल्या. दरम्यान, भाजपाने या निवडणुकीतून माघार घेतल्याने डॉ.शैली निवडून आल्या असून यावेळी बिनविरोध त्या निवडून आल्या आहेत.