केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी मंगळवारी समाजवादी पक्षावर जोरदार निशाणा साधला आणि म्हटले की, समाजवादी पार्टीसाठी ‘एबीसीडी’चा अर्थ वेगळा आहे. “ए म्हणजे अपराध-आतंक, बी – भाई-भतीजावाद, सी- करप्शन आणि डी म्हणजे दंगा ”, हरदोई येथे पक्षाच्या ‘जनविश्वास यात्रे’ अंतर्गत आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. समाजवादी पार्टीची एबीसीडी उलटी आहे. तसेच, ही संपूर्ण एबीसीडी फोडण्याचे काम भाजपाने केले आहे, असेही अमित शाह म्हणाले.

तसेच, “काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने छापा टाकला तेव्हा अखिलेशच्या पोटात दुखणे सुरू झाले होते, म्हणू लागले की राजकीय द्वेषातून छापा टाकला आणि आज त्यांना काय बोलावं हेच कळत नाही. कारण समाजवादी अत्तर बनवणाऱ्याच्या घरी छापेमारीत (कनौज आणि कानपूरमधील परफ्यूम विक्रेत्यांवर छापेमारी ) अडीचशे कोटी रुपये सापडले आहेत.

शाह यांनी प्रश्न उपस्थित केला की, ” कोणी अडीचशे कोटी रुपये पाहिले आहेत का? हे उत्तर प्रदेशच्या जनतेचे लुटलेले अडीचशे कोटी अंतरवाल्याच्या घरातून निघाले आहेत. अखिलेश यादव तुम्ही आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका, मोदींनी सत्तेत येण्यापूर्वीच सांगितले होते की भाजपा या देशातून भ्रष्टाचार नष्ट करेल, काळा पैसा संपवेल.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात ३०० पेक्षा अधिक जागांसह भाजपाचे सरकार पुन्हा स्थापन होणार आहे, असा दावा करत त्यांनी सपासह बहुजन समाज पार्टीवर हल्ला चढवला. २०१४, २०१७ आणि २०१९ मध्ये भाजपाने विजय मिळवला आहे, तर आता २०२२ मध्ये भाजपा सलग चौथ्या विजयाने सपा-बसपाचा धुव्वा उडवेल. असंही यावेळी शाह यांनी बोलून दाखवले.

Story img Loader