एपी, स्टॉकहोम
वसाहतवादाच्या चरक्यात पिचल्या गेलेल्या पिढीच्या वेदनांना आणि निर्वासितांच्या दु:खांना कथारूप देणारे टांझानिया या पूर्व आफ्रिकी राष्ट्राचे लेखक अब्दुलरझाक गुर्ना यांना यंदाचे साहित्याचे नोबेल जाहीर करण्यात आले.
जगासाठी अज्ञात असलेल्या प्रदेशातील आयुष्य त्यांनी आपल्या कादंबऱ्यांमधून चितारले. लेखकाच्या एकूण साहित्यिक योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. १० अब्ज स्वीडिश क्रोनोर (सुमारे १.१४ दशलक्ष पौंड) असे प्रतिष्ठित अशा नोबेल पारितोषिकाचे स्वरूप आहे. नायजेरियातील लेखक वोल सोयिंका यांना १९८६ साली नोबेलने गौरविण्यात आले होते. त्यानंतर नोबेल मिळविणारे ते दुसरे कृष्णवर्णी आफ्रिकी आहेत.
झांझिबारमध्ये १९४८ साली जन्मलेले गुर्ना १९६०च्या दशकात निर्वासित म्हणून ब्रिटनमध्ये आले. हिंसा-यादवी आणि आर्थिक कोंडीत अडकलेल्या आफ्रिकी राष्ट्रांतून अमेरिका आणि ब्रिटनमध्ये निर्वासितांचे लोंढे या दशकात दाखल होत होते. या राष्ट्रांमधील लोकशाहीचे वातावरण, कला-संस्कृती आणि शिक्षणाचा अंगिकार करून या निर्वासितांची पिढी आपल्या मायभूमीचा अंश आपल्या कलेमध्ये उतरवत होती. अब्दुलरझाक गुर्ना या पिढीचे प्रतिनिधी.
वसाहतोत्तर कालावधीतील साहित्य हा त्यांचा अभ्यासाचा विषय. केंट विद्यापीठात अनेक वर्षे ते इंग्रजीचे प्राध्यापक होते. ‘पॅरेडाईझ’ या कादंबरीमुळे ते जागतिक साहित्य वर्तुळात ओळखले गेले. ही कादंबरी १९९४ साली ‘बुकर’ पारितोषिकाच्या लघुयादीत दाखल झाली होती. वसाहतोत्तर कालातील महत्त्वाच्या लेखकांपैकी सर्वोत्तम म्हणून स्वीडिश अकादमीने गुर्ना यांचा गौरव केला.
साहित्य संपदा
१० कादंबऱ्या व अनेक लघुकथा आणि निबंधांचे लेखन. ज्यात मेमरी ऑफ डिपार्चर (१९८७), पिलग्रिम्स वे (१९८८), पॅराडाइज (१९९४), बाय द सी (२००१), डेझर्टेशन (२००५), ग्रेवेल हार्ट (२०१७) व आफ्टरलाइव्ह्स (२०२०) चा समावेश.
ज्या स्थितीत मी इंग्लंडमध्ये आलो, ती सर्वात भीषण होती. युद्धखोर राष्ट्रांतून जगण्यासाठी संघर्ष आणि धडपड करावी लागत होती. या पुरस्कारामुळे निर्वासितांच्या प्रश्नांवर तसेच वसाहतवादावर नव्याने चर्चा होऊ शकेल. – अब्दुलरझाक गुर्ना