उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सभापती रमेश यादव यांचा मुलगा अभिजीत यादवच्या हत्येमागील धक्कादायक सत्य समोर आले आहे. रमेशची आई मीरा यादव यांनीच ही हत्या केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. २२ वर्षीय अभिजीत दाऊ पिऊन घरी येत असे. घरी आल्यावर तो दारूच्या नशेत धिंगाणा घालायचा. या रोजच्या गोंधळाला कंटाळून आपणच त्याची हत्या केल्याचं मीरा यादव यांनी पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबामध्ये म्हटले आहे.

अभिजीतचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं भासवून यादव कुटुंबानं त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा संशय आल्यानं पोलिसांनी अंत्यसंस्कार थांबवले. त्यानंतर अभिजीतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक सर्वेश मिश्रा यांनी एएनआयशी बोलताना सांगितले. शवविच्छेदनामध्ये अभिजीतचा मृत्यू गळा दाबण्यात आल्यानं झाल्याचं स्पष्ट झालं.

शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी सुरू केली. या चौकशीदरम्यान अभिजीतच्या आईने आपला गुन्हा कबूल केला. आईने दिलेल्या माहितीनुसार २० ऑक्टोबर रोजी अभिजीत दारू पिऊन घरी आला. दारूच्या नशेतच त्याने आईशी वाद घालायला सुरुवात केली. त्यावेळी रागाच्या भरता आपण गळा दाबून अभिजीतची हत्या केल्याचे मीरा देवी यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी मीरा देवीला अटक केली असून पुढील तपास सुरु असल्याचेही मिश्रा म्हणाले. मुलाला लागलेले दारुचे व्यसन आणि दारू पिऊन वाद घालण्याच्या या सवयीला कंटाळेल्या मीरा यांनी टोकाची भूमिका घेतल्याचेही पोलिसांनी सांगितले.

अभिजीत याचा मृतदेह रविवारी हजरतगंज येथील यादव कुटुबियांच्या राहत्या घरी संशयास्पद स्थितीत आढळून आला. या प्रकरणात यादव कुटुंबाने सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी चुकीची माहिती दिली. अभिजीत शनिवारी रात्री उशीरा घरी आल्यानंतर त्याच्या छातीत दुखत असल्याचं त्यानं आईला सांगितलं. त्यानंतर आईनं त्याच्या छातीला मालीश केल्यानंतर अभिजीत झोपी गेल्याची माहिती कुटुंबाने पोलिसांना दिली. सकाळच्या सुमारास अभिजीतचा मृत्यू झाल्याचे आम्हाला समजल्याचे कुटुबियांचे म्हणणे होते. अभिजीत हा आपल्या आई आणि भावाबरोबर रहायचा. त्यामुळेच या हत्येमध्ये अभिजीतच्या भावाचाही हात आहे का यासंदर्भात पोलीस तपास करीत आहे. मीरा या विधान परिषदेचे सभापती रमेश यादव यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत.

Story img Loader