आपण लवकरात लवकर विमानाच्या कॉकपिटमध्ये परतण्यास इच्छुक आहोत, असे भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणावाचा चेहरा ठरलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी भारतीय वायुदलाच्या उच्चपदस्थ नेतृत्वाला कळवले असल्याचे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले.
भारतीय वायुदलाच्या या वैमानिकावर गेले दोन दिवस येथील लष्कराच्या रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. आपण लवकरात लवकर विमान उडवू इच्छितो, असे वर्धमान यांनी वायुदलाच्या वरिष्ठ कमांडरना तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सांगितले.
पाकिस्तानी वायुदलाशी झालेल्या संघर्षांत एफ- १६ लढाऊ जेट विमान पाडणारे अभिनंदन हे बुधवारी भारतीय वायुदलाचे पहिले वैमानिक ठरले. याच संघर्षांत त्यांचे मिग-२१ बायसन विमान पाडण्यात आल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने त्यांना पकडले. शुक्रवारी रात्री ते भारतात परतल्यानंतर त्यांचे विजयी वीरासारखे स्वागत करण्यात आले.
लष्कराच्या ‘रिसर्च अॅण्ड रेफरल हॉस्पिटल’मध्ये वर्धमान यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे एक पथक देखरेख ठेवून आहे. ते लवकरच विमानाच्या कॉकपिटमध्ये परततील हे निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे लष्कराचा एक अधिकारी म्हणाला. पाकिस्तानात छळ करण्यात येऊनही वर्धमान यांचे मनोधैर्य उंचावलेलेच असल्याचा त्याने आवर्जून उल्लेख केला.