कर्नाटकातील शिक्षण संस्थांत पेच
‘हिजाब’बाबतच्या वादाने कर्नाटकमधील शैक्षणिक संस्थांना घेरले असतानाच, दक्षिण कन्नड व बागलकोट जिल्ह्यांमधील काही विद्यार्थी शुक्रवारी कथितरीत्या शाळांमध्येच नमाज पढत असल्याचे दाखवणारे दोन व्हिडीओ समाजमाध्यमांवर फिरत आहेत.
दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एका सरकारी प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीत काही विद्यार्थी नमाज पढत असल्याची दृश्यफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आहे. ४ फेब्रुवारीला घडलेल्या या घटनेची व्हिडीओ क्लिप समाजमाध्यमांवर वेगाने फिरल्यानंतर आणि स्थानिक लोकांनी त्याबाबत आक्षेप नोंदवल्यानंतर ही घटना उघडकीला आली.
याबाबत तक्रारी आल्यानंतर, शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी या शाळेला भेट दिली. वर्गात धार्मिक कृत्ये करू नये असा आदेश आपण विद्यार्थ्यांना दिला असल्याचे शिक्षकांनी सांगितले. शिक्षण खात्याने त्याच्या ‘रिसोर्स पर्सन’ला शाळेला भेट देऊन या घटनेबाबतचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश दिले असल्याचे खंड विकास अधिकारी सी. लोकेश म्हणाले.
शाळेचे अधिकारी, विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यात झालेल्या एका बैठकीनंतर या मुद्दय़ावर तोडगा निघाला. आपले विद्यार्थी शाळेच्या परिसरात असे कृत्य पुन्हा करणार नाहीत असे आश्वासन पालकांनी दिले असल्याचे या बैठकीला हजर असलेले लोकेश यांनी सांगितले.
दुसऱ्या घटनेत, बागलकोट जिल्ह्यातील एका शाळेत किमान ६ विद्यार्थी नमाज पढताना दिसून आले. शाळेच्या अधिकाऱ्यांनी यासाठी परवानगी दिल्याचा आरोप करून काही पालकांनी या कृतीवर आक्षेप घेतला. शाळेच्या परिसरात नमाज न पढण्याचे निर्देश विद्यार्थ्यांना देण्यात आले असल्याचे या शाळेच्या प्राचार्यानी इळकल येथे पत्रकारांना सांगितले. २४ जानेवारीला कोलारमधील मुळबागल शहरातील एका सरकारी शाळेत काही विद्यार्थ्यांनी नमाज पढल्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला होता.
सोमेश्वरपालया येथील शाळेत शुक्रवारच्या प्रार्थनेला परवानगी देऊन नव्या पायंडा पाडल्याबद्दल इतर विद्यार्थ्यांचे पालक, शाळेचे माजी विद्यार्थी आणि एका ज्ञाती संघटनेचे काही सदस्य यांनी येथे निदर्शने केली. विद्यार्थी वर्गात नमाज पढत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण चिघळले होते.
राज्याच्या काही भागांत उच्च माध्यमिक विद्यालये आणि महाविद्यालयांच्या परिसरात हिजाब विरुद्ध भगवे शेले या वादाचा परिणाम तणाव आणि अनुचित घटनांमध्ये झाला होता, तसेच काही ठिकाणी त्याने हिंसक वळण घेतले होते.
अन्य देशांची शेरेबाजी नको; परराष्ट्र खात्याची भूमिका
नवी दिल्ली : कर्नाटकातील काही शैक्षणिक संस्थांमध्ये तापत असलेल्या ड्रेस कोडबाबतच्या वादावर काही देशांनी केलेली टीका अमान्य करताना, देशाच्या अंतर्गत मुद्दय़ांवर अशी ‘प्रेरित शेरेबाजी’ खपण्यासारखी नाही, असे भारताने शनिवारी सांगितले.
ज्यांना भारताची चांगल्याप्रकारे ओळख आहे, ते वस्तुस्थिती योग्यरीतीने समजू शकतात, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अिरदम बागची म्हणाले. ‘कर्नाटकच्या काही शैक्षणिक संस्थांतील ड्रेस कोडबाबतचे प्रकरण हे कनार्टक उच्च न्यायालयाच्या न्यायिक तपासणीखाली आहे,’ असे त्यांनी सांगितले.
‘आमची घटनात्मक चौकट व यंत्रणा, तसेच आमची लोकशाही व्यवस्था व राज्यव्यवस्था यांच्या संदर्भात मुद्दय़ांवर विचार करून ते सोडवले जातात,’ असे बागची यांनी स्पष्ट केले. कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांतील ड्रेस कोडबाबत काही देशांनी केलेल्या वक्तव्यांबबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
नियम पाळणार की नाही, हाच प्रश्न-आरिफ मोहम्मद खान
नवी दिल्ली : हिजाबच्या मुद्दय़ावरून सध्या सुरू असलेला वाद हे ‘कारस्थान’ असल्याचे वर्णन करतानाच, हा निवडीचा प्रश्न नसून एखाद्या व्यक्तीने एखाद्या संस्थेचे नियम व ड्रेस कोड यांचे पालन करावे की नाही, याचा आहे असे मत केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी व्यक्त केले.
‘कृपया याला वाद समजू नका.. हे कारस्थान आहे,’ असे शेजारच्या कर्नाटकमध्ये सध्या तापलेल्या हिजाबच्या मुद्दय़ावर प्रतिक्रिया देताना खान यांनी नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितले.
इस्लामचा इतिहास पाहिला तर महिलांनी हिजाब घालण्यास नकार दिल्याची उदाहरणे असल्याचे खान यांनी म्हटले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.