आर्थिक आघाडीवर मंदीसदृश वातावरण असल्याने रेल्वेची प्रवासी वाहतूक ४ ते ५ टक्क्य़ांनी घटली आहे. विशेषत: कमी अंतराच्या रेल्वेगाडय़ांच्या प्रवाशांच्या संख्येत घट झाली असल्याचे रेल्वेच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
उत्तर रेल्वेचे महाव्यवस्थापक एस.के.अगरवाल यांनी सांगितले की, मंदीसदृश स्थितीने रेल्वे प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. स्वाभाविकपणे व्यावसायिक वर्गातून जाणारे प्रवासी कमी आहेत व गरीब लोकांचाही रेल्वे प्रवास कमी झाला आहे. हा परिणाम संपूर्ण देशभरात आहे का, असे विचारले असता त्यांनी सांगितले की, अनारक्षित गटात सगळीकडे प्रवाशांची संख्या कमी होत आहे.
काही लांब अंतराच्या गाडय़ांनी मात्र प्रवासी गमावलेले नाहीत. शताब्दी किंवा त्यासारख्या इतर गाडय़ांचे प्रवासी कायम आहेत. कमी अंतराच्या रेल्वे सुविधा कमी आहेत, त्यामुळेही प्रवासी संख्येवर परिणाम होत आहे. शताब्दी एक्स्प्रेस लोकप्रिय आहे, या गाडीचे प्रवासी कमी होणार नाहीत. साधारण १००-१२५ कि.मी. प्रवास असलेल्या प्रवाशांची संख्या कमी होत आहे. चंडीगड व अंबाला रेल्वे स्थानकांवर जलद गती सेवा देण्यात येत असल्याबाबत त्यांनी सांगितले की, चंडीगड-अंबाला रेल्वे लाईन दुप्पट करण्यात येत आहे पण म्हणून तेथे बुलेट ट्रेन धावणार नाही. दुहेरी मार्गामुळे प्रवासी संख्या वाढेल. दिल्ली-आग्रा मार्गाचे काम सुरू होत आहे. अंबाला-डप्पर विभागात वर्षअखेरीस काम सुरू होईल व ते डिसेंबर २०१६ पर्यंत पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले.

Story img Loader