Abu Julani : सीरियातलं मुख्य शहर अलेप्पोवर इस्लामचा कट्टरपंथी समूह हयात तहरीर अल शामने (HTS) कब्जा केला आहे. HTS च्या नेतृत्वात हमा या शहरावरही कब्जा करण्यात आला आहे. एचटीएसचा प्रमुख नेता अबू मोहम्मद अल जुलानी याच्यावर मानवाधिकारांचं उल्लंघन केल्याचे आरोप आता होत आहेत. त्याच्यामुळेच सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांना पळून जावं लागलं आपण जाणून घेऊ अबू मोहम्ममद अल जुलानी ( Abu Julani ) कोण आहे?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अबू मोहम्मद अल जुलानी कोण आहे?

अबू मोहम्मद अल जुलानी ( Abu Julani ) हे एक टोपण नाव आहे. त्याचं खरं नाव काय आणि खरं वय काय? याबाबत वाद आहेत. अबू जुलानीने ( Abu Julani ) सुरुवातीला त्याची प्रतिमा उदारमतवादी व्हावी यासाठी प्रयत्न केले. दरम्यान अमेरिकेने अबू जुलानीवर एक कोटी डॉलर्सचं बक्षीस ठेवलं आहे. अबू जुलानीने अमेरिकेतील पीबीएसला फेब्रुवारी २०२१ मध्ये दिलेल्या मुलाखतीत काही खुलासे केले आहेत. या मुलाखतीत अबू जुलानीने सांगितलं होतं की जन्माच्या वेळी त्याचं नाव अहमद अल शारा होतं आणि तो मूळचा सीरियाचा आहे. त्याचं कुटुंब गोलान या भागात वास्तव्य करत होतं. अबू मोहम्मद अल जुलानीचा जन्म सौदी अरेबियाची राजधानी रियाध या टिकाणी झाला होता. अबू अल जुलानीचे वडील रियाध या ठिकाणी काम करत होते. त्यानंतर अबू अल जुलानी ( Abu Julani ) सीरियाची राजधानी दमास्कमध्ये लहानाचा मोठा झाला. याच शहरात त्याचं शिक्षणही पार पडलं असं त्याने सांगितलं होतं.

अबू अल जुलानी याचा जन्म रियाधमध्ये झाला

बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार अबू मोहम्मद अल जुलानी उर्फ अहमद हुसैन अल शाराचा जन्म १९८२ यावर्षी रियाधमध्ये झाला होता. तर इंटरपोलच्या माहितीनुसार त्याचा जन्म १९७९ मध्ये झाला होता. १९८९ मध्ये जुलानीचं कुटुंब सीरियात परतलं. तर २००३ मध्ये इराकवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्याच्या काही काळ आधी अल जुलानी हा अल कायदा या दहशतवादी संघटनेत गेला.

हे पण वाचा- Syria Crisis: ‘लवकरात लवकर तिथून निघा’ सीरियामधील भारतीय नागरिकांना परराष्ट्र मंत्रालयाचे आवाहन; कारण काय?

अल कायदा या दहशतवादी संघटनेत तो सहभागी झाला होता

अल जझिऱाच्या एका वृत्तानुसार अमेरिकन सैन्याच्या विरोधात लढण्यासाठी जुलानी हा इराकलाही गेला आणि त्यानंतर अल कायदा या दहशतवादी संघटनेत सहभागी झाला. अल कायदा मध्ये तो एक वर्ष होता. २००६ मध्ये जुलानीला ( Abu Julani ) पाच वर्षांचा तुरुंगवास झाला होता. तुरुंगातून बाहेर आल्यावर अबू जुलानी ( Abu Julani ) सीरियात आला. त्यानंतर अल कायद्याशी संबंधित अल नुसरा ही फ्रंट सुरु करण्याची जबाबदारी त्याने घेतली. अबू जुलानीने ( Abu Julani ) अल बगदादीबरोबरही काम केलं आहे. २०१३ मध्ये बगदादीने अल कायदा सह सगळे संबंध संपवत असल्याचं जाहीर केलं. जुलानी अल कायदासह काम करत राहिला. २०१७ मध्ये अल जुलानीने असंही म्हटलं होतं की त्यांच्या गटाने सीरियातील इतर बंडखोरांच्या गटांना त्यांच्यात सामील करुन करुन घेतलं. त्याने हयात तहरीर अल शाम असं नाव या संघटनेला दिलं. अल जुलानी हा या संघटनेचा प्रमुख आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abu julani news who is abu mohammad julani chief of hayat tahrir al sham in syria scj