त्रिपुरातील उनाकोटी येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. उनाकोटी येथील चौमुहनी परिसरातून जाणाऱ्या रथयात्रेचा विद्युत वाहक तारांना स्पर्श झाल्याने सहा जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
शेकडो लोकांच्या उपस्थित काढलेल्या या रथयात्रा मिरवणुकीदरम्यान ही दुर्घटना घडल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. ‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, उनाकोटी येथील चौमुहनी परिसरात रथयात्रा काढली होती. दरम्यान, या रथावर एक विद्युत वाहक तार पडली. यावेळी रथावर किमान २० लोक बसले होते. विजेचा धक्का बसून यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.
विद्युत वाहक तार पडल्याने रथालाही आग लागली आणि यामध्येही काही लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सर्व जखमींना सुरुवातीला कुमारघाट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तेथून सर्वांना उनाकोटी जिल्हा रुग्णालयात हलवण्या आलं.