अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या शिवखोरी येथे देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांची बस १५० फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात २१ भाविकांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा एक बस नदीत कोसळून अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील अलकनंदा नदीत ही बस कोसळली. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले आहेत. धोकादायक वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, ही गाडी हरियाणामध्ये नोंद झालेली आहे. दिल्लीहून चोपताच्या दिशेनं जात असताना रुद्रप्रयाग जिल्ह्यात अलकनंदा नदीजवळ चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींमध्ये ६ पुरुष आणि सहा महिलांचा समावेश आहे. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात एसडीआरएफच्या जवानांना यश आलं आहे.
एसडीआरएफचे कमांडंड मनिकांत मिश्रा यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, “समोर आलेल्या प्राथमिक माहितीवरून हा अपघात सकाळी ११.३० च्या सुमारास घडला. ही प्रवासी वाहतूक करणारी एक टेम्पो ट्रॅव्हलर आहे. ही गाडी रुद्रप्रयाग शहरापासून काही अंतरावर गेली असता तिथेच चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी बाजूच्या अलकनंदा नदीत जाऊन कोसळली. प्राथमिक चौकशीवरून धोकादायक वळण पार करता न आल्यामुळे चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्याचं स्पष्ट झालं आहे”.
१४ जखमींवर उपचार चालू
दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या १५ जणांवर नजीकच्या रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्यातील चार जण गंभीर जखमी असून त्यांना ऋषीकेश येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
दरम्यान, अपघाताचं वृत्त समोर आल्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. “रुद्रप्रयागमध्ये झालेल्या अपघाताचं अत्यंत वेदनादायी वृत्त समजलं. स्थानिक प्रशासन व एसडीआरएफची पथकं बचावकार्य व जखमींवरील उपचारांची व्यवस्था करत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना या अपघात प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत”, अशी पोस्ट पुष्कर सिंह धामी यांनी एक्सवर केली आहे.