एकनाथ खडसे, भाजप नेते
गोपीनाथ मुंडे आणि अपघात हे जणू समीकरणच होते. मी सोबत असतानाच चार-पाच जीवघेण्या प्रसंगांमधून आम्ही बालंबाल बचावलो होतो. त्या प्रसंगांची आठवण झाली की आजही अंगावर काटा येतो. युतीची सत्ता असताना महाबळेश्वरला मंत्रिमंडळाची बैठक होती. काही मंत्री आदल्या दिवशी तेथे गेले होते व मीही निघालो होतो. पण मुंडे यांचा दूरध्वनी आला व आपण हेलिकॉप्टरने जाऊ, असे त्यांनी सांगितले. आम्ही राजभवनावर जाऊन हेलिकॉप्टरने निघालो, तेव्हा हवामान चांगले होते. पण महाड-पोलादपूरजवळ असताना दाट धुके लागले. त्यामुळे माघारी फिरावे लागेल, असे वैमानिकाने सांगितले. पण जागा मिळेल तिथे उतरविण्याचा आग्रह मुंडे यांनी धरला. दाट झाडीतून वाट काढत वैमानिकाने नाईलाजाने उतरविले व तो परत गेला. आम्ही दोघे व मुंडे यांचा एक अंगरक्षक चालतचालत मुंबई-गोवा महामार्गाकडे वाटचाल करीत होतो. एका चहाच्या टपरीवर बसून जवळ पोलीस चौकी आहे का, अशी विचारणा केली. मुंडे यांच्याकडे पाहून तो चहावालाही चक्रावला. आपण मुंडेंसारखे दिसता असे त्याने विचारले. मीच उपमुख्यमंत्री व गोपीनाथ मुंडे हे सांगूनही त्याला खरे वाटत नव्हते. शेवटी खात्री पटल्यावर तो झटकन सायकलवरून एक किमीवरील पोलीस चौकीत गेला. हवालदारही धावतपळत आला. गोवा महामार्गावर एक गाडी थांबवून लिफ्ट मागितली. दस्तुरखुद्द मुंडेसाहेब गाडीत बसणार, हे पाहून ते कुटुंब खूष झाले. त्यांच्या गाडीतून प्रवास करेपर्यंत सरकारी यंत्रणेची चक्रे फिरली होती. बिनतारी संदेश यंत्रणेवर निरोप गेले होते. सरकारी गाडय़ा आल्या आणि मुंडेंसह आम्ही पुढे रवाना झालो.
एकदा एका छोटय़ा विमानातून प्रवास करीत असतानाही असाच प्रकार झाला. काच फुटल्याने विमान हेलखावे खाऊ लागले. पण आम्ही सुरक्षितपणे उतरलो. पुणे-मुंबई हेलिकॉप्टर प्रवासात लोणावळ्याजवळ अचानक हवामान ढगाळ झाले. हेलिकॉप्टर पुन्हा पुण्याकडे वळवावे, असा वैमानिक सांगत होता. पण कमी उंचीवर गेल्यास जाता येईल, असे मुंडे यांनी सुचविले. पण खाली गेल्यावर उच्चदाबाच्या वाहिन्या दिसू लागल्या व पुन्हा तारांबळ उडाली. शेवटी हेलिकॉप्टर पुण्याला न्यावे लागले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठीही तांदूळवाडी (ता. रावेर) येथे मुंडे आले होते. तेथे पावसामुळे झालेल्या चिखलात हेलिकॉप्टर रुतले. हेलिकॉप्टर उडणार नाही व प्रचाराला पुढे जाता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. तरीही मुंडे यांनी उड्डाण करण्याची सूचना केली व त्या हवामानातही प्रचार सभा पूर्ण केल्या. अशा प्रकारचे अपघाताचे अनेक प्रसंग मुंडे यांच्या जीवनात आले. जणू त्यांच्या जीवनाचे ते समीकरणच बनले होते.  दाऊद इब्राहिमविरोधात ते बोलत असत. तेव्हा त्यांच्या जीविताला काही धोका होईल का, अशी भीती आम्हाला वाटत असे. पण ते निडरपणे बोलत असत. प्रमोद महाजन गेल्यानंतर भाजपमध्ये निर्माण झालेली पोकळी मुंडे यांनी भरून काढली. शेवटी महाजन हे महाजन होते, मुंडे हे मुंडेच होते, आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठीमाझ्या घरी रविवारी रात्री साडेतीन तास बैठक झाली. मुंडे यांच्या नेतृत्वाखालीच विधानसभा निवडणुका लढवायचा निर्णय आम्ही घेतला होता. राज्यात सत्ता काबीज करण्याचे त्यांचे मनसुबे पूर्ण होण्याआधीच ते निघून गेले.

Story img Loader