पंकज भोसले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जयपूर : मनोरंजनाच्या आणि समाजमाध्यमांच्या गराडय़ात गोष्ट सांगण्याची कला संपून जाईल अशी भीती वाटत असताना उलट पूर्वीपेक्षा चार-पाच पट नवे कथाकार हिंदीत तयार होत आहेत. माझ्या समकालात केवळ दहा तरुण कथाकार सक्रीय असतील, पण आज एकाच वेळी ३० ते ४० नव्या कथाकारांची फळी तयार झाली आहे, ते एकाचवेळी प्रतिभाशाली देखील आहेत आणि एकमेकांशी स्पर्धा करीत सकस कथा घडवत आहेत, असे प्रसिद्ध हिंदी कथालेखक आणि कादंबरीकार मनोज रुपडा यांनी सांगितले.

जयपूर साहित्य महोत्सवात ‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी हिंदी साहित्यातील बदलत्या प्रवाहांवर, हिंदीला इंटरनॅशनल बुकर मिळाल्यानंतर बदललेल्या साहित्य पटलाबद्दल आणि प्रादेशिक भाषेतील कथनसाहित्य इंग्रजीत गेल्यानंतर होणाऱ्या बदलांबद्दल चर्चा केली.

हेही वाचा >>>“कब्रस्तान नव्हे, ते महाभारतकालीन…”, ज्ञानवापीपाठोपाठ हिंदू संघटनांच्या आणखी एका लढ्याला यश; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

‘जेसीबी’ या भारतातील महत्त्वाच्या इंग्रजी साहित्य पुरस्कारांच्या लघुयादीत यंदा मनोज रुपडा यांच्या ‘काले अध्याय’ या हिंदी कादंबरीचा ‘आय नेम्ड माय सिस्टर सायलन्स’ या अनुवादाचा समावेश होता. गेल्या तीन दशकांपासून हिंदीत सातत्याने ‘लंबी कहानी’ लिहिणारा हा लेखक उमेदीची काही वर्षे मुंबईत राहिला.  

मनोज पांडे, चंदन पांडे, राकेश मिश्रा, कुणाल सिंह हे आजचे हिंदी कथाकार नव्या दमाची आणि फॉर्मची कथा घेऊन ‘हिंदी कहानी’ लिहीत आहेत. त्यांच्याबरोबरीने वेगवेगळय़ा हिंदी पट्टय़ातून नवे कथाकार उदयाला येत आहेत. सातत्याने उत्तम कथा त्यांच्याकडून येत आहेत. त्यामुळे पुढील काळात तरी कथा या माध्यमाची चिंता हिंदी साहित्याला नाही, असे रुपडा यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा >>>इम्रान खान ९ मेच्या हल्ल्याचे मास्टरमाइंड! लष्करी न्यायालय सुनावणार शिक्षा

मुंबईची आठवण..

मुंबईत घाटकोपर येथे माझा मिठाईचा व्यवसाय होता. त्या बाजूला एका चाळीमध्ये हिंदी चित्रपट संगीतकारांसाठी काम करणारे दुय्यम व तिय्यम स्तराचे  वादक राहत. सिंथेसायझरमुळे अनेकांचा रोजगार हळूहळू संपत चालला होता. कैक दिवस काम न मिळणाऱ्या सेक्सोफोन वादकाकडून ही परिस्थिती कळाली, त्यानंतर त्यांच्या त्या दु:खांवर ‘साज-नासाज’ ही कथा लिहिली गेली, ही आठवण त्यांनी सांगितली. हिंदीतील गेल्या तीन दशकातील महत्त्वाच्या कथांमध्ये या कथेचा समावेश केला जातो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: According to hindi writer manoj rupada the medium of story is intact even in multiple entertainment options amy