एक मार्च, करोनाचा देशात उद्रेक होण्यापूर्वी भारतात पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट बनवणारी एकही फॅक्टरी नव्हती. पण, १८ मे पर्यंत तब्बल ४.५ लाख पीपीई किट्स प्रतिदिन तयार केले जाऊ लागले. गुंतवणूक सुविधांसाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या इनव्हेस्ट इंडिया या कंपनीने प्रसिद्ध केलेल्या एका माहितीपुस्तिकेत ही माहिती दिली आहे.
संदर्भासाठी ३० मार्च ही तारीख घेतल्यास या दिवशी भारतात प्रतिदिन ८,००० पीपीई किट तयार केले जात होते. त्यानंतर हा अकडा वाढतच गेला. त्यामुळे पीपीई किट बनवणाऱं हे क्षेत्रचं आता ७,००० कोटी रुपयांची उलाढाल असलेली बाजारपेठ बनली आहे. भारतात या क्षेत्रानं केवळ ६० दिवसातचं ५६ पटींनी वाढ नोंदवली आहे. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे.
पीपीई किटमध्ये मास्क (एन ९५), ग्लोव्ह्ज (सर्जिकल आणि तपासणी), कोव्हराल्स (चेन असलेला पूर्ण लांबीचा बाहेरील कोट) आणि गाऊन, हेड कव्हर, गॉगल, फेस शिल्ड आणि शू कव्हर या गोष्टींचा समावेश असतो. आजच्या घडीला भारतात ६०० पेक्षा अधिक कंपन्यांना पीपीई किट तयार करण्यासाठी प्रमाणित करण्यात आलं आहे. या क्षेत्राची जागतिक बाजारपेठ सन २०२५ पर्यंत सुमारे ९२.५ बिलियन डॉलरपेक्षा जास्त झालेली असेल. जी सन २०१९ मध्ये ५२.७ बिलियन डॉलर इतकी होती.
चीननंतर लागतो भारताचा क्रमांक
चीन सध्या सर्वाधिक पीपीई किट बनवणे आणि त्याची निर्यात करण्यामध्ये जगाचं नेतृत्व करीत आहे. भारतीय पीपीई किट उत्पादकांसाठी अमेरिका आणि आशिया खंडातील देश ही सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. या दोन रिजनमध्ये पीपीई किटच्या बाजाराचा एकत्रितपणे ६१ टक्के हिस्सा आहे. यामध्ये युरोप ही अतिरिक्त २२ टक्के हिस्सा असलेली बाजारपेठ आहे.
…तर भारतीय कंपन्यांवरील निर्यातबंदी उठवणार
सध्या भारतीय पीपीई किट्स बनवणाऱ्या कंपन्यांना परदेशात निर्यातीवर बंदी आहे. कारण या पीपीई किट्सची खरी गरज देशात करोनाविरोधात फ्रंटलाइनवर लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या अॅपरल एक्पोर्ट प्रमोशन काउन्सिलने (AEPC) आपल्या वेबिनारमध्ये म्हटले होते की, देशातील पीपीई किट्सची मागणी पूर्ण करण्यात स्थानिक कंपन्या यशस्वी झाल्या की, यावरील निर्यातबंदी लवकरच उठवण्यात येईल.
पीपीई किट बनवण्याचे बंगळूरु देशातील सर्वात मोठे हब
भारतात सध्या मागणीनुसार १५.९६ लाख पीपीई किट्स तयार आहेत तसेच आणखी २.२२ कोटी किट्स तयार केले जात आहेत. यामध्ये कर्नाटकची राजधानी बंगळूरु शहर हे पीपीई किट बनवण्याचे देशातील सर्वात मोठे हब बनले आहे. या एकट्या शहरात ५० टक्के पीपीई किट्स तयार केले जात आहेत. पीपीई किट बनवणाऱ्या इतर केंद्रांमध्ये तिरुपूर, कोईम्बतूर, चेन्नई, अहमदाबाद, वडोदरा, लुधियाना, भिवंडी, कोलकाता, नोयडा आणि गुरगाव या शहरांचा समावेश आहे.
इंडिया इन्व्हेस्ट पेपरच्या माहितीनुसार, सन २००२ ते २००४ मध्ये आलेल्या सार्सच्या साथीनंतर भारत आता पीपीई किटच्या वाढत चाललेल्या बाजारपेठेचं लक्ष वेधून घेत आहे. आत्तापर्यंत सिंगापूरकडे पुरेशा डिस्पोजेबल पीपीई किट्सचा साठा उपलब्ध होता. त्याचा उपयोग सध्याच्या करोनाच्या साथीमध्ये मोठ्या प्रमाणावर झाला.