पीटीआय, नवी दिल्ली
स्टेट बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगाने गुरुवारी निवडणूक रोख्यासंदर्भातील माहिती जाहीर केली. सांतियागो मार्टिनच्या ‘फ्युचर गेमिंग’ने देशभरातील बहुतेक राजकीय पक्षांना देणग्या दिल्या आहेत. ५४० कोटी रुपयांची देणगी मिळविणारा तृणमूल काँग्रेस ‘फ्युचर गेमिंग’चा सर्वात मोठा लाभार्थी आहे. भाजप, काँग्रेस, द्रमुक, वायएसआर काँग्रेस या पक्षांनाही राजकीय देणग्या देण्यात आल्या आहेत.
राजकीय पक्षांना मिळालेल्या निवडणूक रोख्यांचे विशिष्ट क्रमांक जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात स्टेट बँकेला दिले होते. त्यानुसार स्टेट बँकेने निवडणूक रोख्यांचा तपशील आणि विशिष्ट क्रमांक यांची माहिती निवडणूक आयोगाला दिली आणि आयोगाने गुरुवारी ती आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. राजकीय पक्षांना सर्वाधिक देणगी देणाऱ्या ‘फ्युचर गेमिंग’ने १,३६८ कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले. या कंपनीने द्रमुकला ५०९ कोटी, वायएसआर काँग्रेसला १६० कोटी, भाजपला १०० कोटी आणि काँग्रेसला ५० कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत. सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा आणि सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट या सिक्कीममधील राजकीय पक्षांना १० कोटींपेक्षा कमी रक्कम मिळाली आहे.
कुणाला किती देणग्या
●हैदराबादस्थित मेघा इंजिनिअरिंग हा दुसरा सर्वात मोठा देणगीदार आहे. या कंपनीने ९६६ कोटींचे निवडणूक रोखे खरेदी केले असून भाजप, भारत राष्ट्र समिती आणि द्रमुक त्याचे लाभार्थी आहेत.
●‘क्विक सप्लाय’ या कंपनीने ४१० कोटींचे निवडणूक रोखे खरेदी केले असून भाजपला ३९५ कोटी आणि शिवसेनेला २५ कोटी रुपये दिले. ‘क्विक सप्लाय’च्या कार्यालयाचा नोंदणीकृत पत्ता नवी मुंबईतील धीरूभाई अंबानी नॉलेज सिटी येथील आहे.
●वेदांत, भारती एअरटेल, मुथूट, बजाज ऑटो, जिंदाल ग्रुप आणि टीव्हीएस मोटर यांसारख्या बड्या कंपन्यांकडून भाजपला मोठा निधी मिळाला आहे.
●वेदांत समूहाने भाजप काँग्रेस, बिजू जनता दल आणि तृणमूल काँग्रेसला, भारती एअरटेलने भाजप, राष्ट्रीय जनता दल, शिरोमणी अकाली दल, काँग्रेस, जनता दल (संयुक्त) यांना तर मुथूट यांनी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांना देणग्या दिल्या.
●उद्याोगपती लक्ष्मी निवास मित्तल यांनी भाजपला देणगी दिली, तर बायोकॉनचे प्रमुख किरण मुझुमदार शॉ यांनी भाजप, तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसला देणगी दिली. रुंगटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडने काँग्रेस, भाजप, तृणमूल काँग्रेस आणि सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाला देणगी दिली.