ब्रिटनच्या महाराणी व युवराज असल्याचे भासवत बोगस दूरध्वनी करून युवराज्ञी केट हिच्या प्रकृतीची चौकशी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन नभोवाणीच्या दोन कुख्यात सूत्रसंचालकांवर फौजदारी कारवाई होण्याची शक्यता मावळली आहे. या प्रकरणात त्या दूरध्वनीला फशी पडलेली भारतीय वंशाची ब्रिटिश परिचारिका जेसिंथा सालढाणा हिने आत्महत्या केली होती.
जेसिंथा किंग एडवर्ड सेव्हन हॉस्पीटलमध्ये कार्यरत होती. तेथेच केट उपचार घेत होत्या. ‘टूडे एफएम’ नभोवाणीवाहिनीच्या मेल ग्रेग आणि मायकेल ख्रिश्चन या दोन सूत्रसंचालकांनी केलेला बोगस दूरध्वनी त्यांनी उचलला आणि त्यांना साक्षात सम्राज्ञी आणि युवराज समजून गोपनीय वैद्यकीय माहिती उघड केली. जेसिंथा यांच्या आत्महत्येनंतर जगभर त्या सूत्रसंचालकांविरोधात टीकेची झोड उठली होती. त्यांच्यावर फौजदारी कारवाई होण्याचीही शक्यता व्यक्त केली गेली होती.
प्रत्यक्षात स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी आमच्याशी तशा कारवाईबाबत कोणताही संपर्क साधला नसल्याचे ऑस्ट्रेलियन पोलिसांनी शुक्रवारी स्पष्ट केल्याने हे दोन्ही डीजे मोकाट सुटल्यात जमा आहेत.