पंजाबमधील चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचे खासगी व्हिडीओ लीक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर विद्यापीठातील विद्यार्थिनींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून या प्रकरणातील दोषींवर कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली जात आहे. विद्यापीठातील वसतीगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीनेच हे व्हिडीओ लीक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपानंतर पोलिसांनी संबंधित विद्यार्थीनीला अटक केली आहे. मात्र, या प्रकरणी चंदीगढ विद्यापीठाने नवा खुलासा केला आहे. आरोपी विद्यार्थीनीने आपले खासगी व्हिडिओ बायफ्रेंडला पाठवले होते. इतर मुलींचे नाही, असा दावा विद्यापीठाने केला आहे. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु आर. एस बावा यांनी याबाबत अधिकृत निवेदनही जारी केलं आहे.
हेही वाचा- पंजाब : चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचे खासगी व्हिडीओ लीक, खळबळजनक घटनेनंतर विद्यार्थिनी आक्रमक
विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुंचे निवेदन
चंदीगड विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू आर एस बावा यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “सात मुलींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या अफवा पसरवण्यात आली आहे. अशा प्रकारचे कृत्य कोणत्याही मुलीने केले नाही. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थीनीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं नसल्याचं प्रभारी कुलगुरू यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच प्राथमिक तपासादरम्यान, विद्यापीठातील, एका मुलीने शूट केलेला वैयक्तिक व्हिडिओ वगळता कोणत्याही विद्यार्थ्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ आढळला नसल्याचे बावा यांनी म्हणलं आहे. तसेच पोलिसांनी संबंधित विद्यार्थीनीचा फोन ताब्यात घेतला असून तपास सुरु असल्याचेही विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार चंदीगड विद्यापीठातील वसतीगृहात राहणाऱ्या काही विद्यार्थिनींचे खासगी व्हिडीओ लीक झाले आहेत. या घटनेनंतर येथे एकच खळबळ उडाली असून विद्यापीठातील विद्यार्थी-विद्यार्थिनी रस्त्यावर उतरले आहेत. वसतीगृहात राहणाऱ्या एका मुलीनेच आपल्या मैत्रिणींचे व्हिडीओ लीक केल्याचे म्हटले जात आहे. व्हिडीओ लीक झाल्यानंतर येथे काही विद्यार्थिनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जातोय. मात्र पोलीस तसेच विद्यापीठ प्रशासनाने हा दावा फेटाळून लावला असून कोणीही आत्महत्या केलेली नसून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. व्हिडीओ लीक झाल्याचे समजल्यानंतर एक विद्यार्थिनी बेशुद्ध पडली. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे.
हेही वाचा- कर्नाटक : कर्मचाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी काँग्रेस नेत्याला अटक
पंजाब सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
पंजाब सरकारने या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. “चंदीगड विद्यापीठातील घटनेबद्दल ऐकून वाईट वाटले. आमच्या मुली हा आमचा अभिमान आहे. मी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. मी सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात आहे. पण सर्वांनी या घटनेबद्दल निर्माण होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली आहे.
महिला आयोगाकडून दखल
दरम्यान, या घटनेची दखल पंजाब महिला आयोग तसेच पंजाबचे शालेय शिक्षणमंत्री हरजोत सिंग बैंस यांनी घेतली आहे. ही अतिशय गंभीर घटना असून चौकशी सुरू आहे. आरोपींना निश्चितच शिक्षा मिळेल, असे पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्षा मनिषा गुलाटी यांनी सांगितले. तर गुन्हेगारांस सोडले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी शांतता बाळगावी, असे आवाहन शिक्षणमंत्री हरजो सिंग बैंस यांनी केले आहे.