दिल्लीतील साहिल गहलोत या २४ वर्षीय तरुणाने त्याची लिव्ह इन पार्टनर निक्की यादव हिचा खून करून तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवल्याची धक्कादायक घटना १४ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी साहिलला अटक केली असून त्याच्या चौकशीनंतर अनेक धक्कादयक खुलासे होत आहेत. दरम्यान, साहिलने २०२० मध्येच निक्कीशी विवाह केला असून ती त्याला दुसरं लग्न करण्यापासून रोखत असल्याने त्याने निक्कीचा खून केल्याची बाब उघडकीस आली आहे. तसेच या खुनात साहिलच्या परिवाराचाही समावेश असल्याचं उघड झालं आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, साहिल आणि निक्कीचे २०२० मध्येच लग्न झाले होते. मात्र, साहिलच्या कुटुंबियांना हा विवाह मान्य नसल्याने त्यांनी साहिलचा दुसऱ्या मुलीशी विवाह लावून देण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या आदल्या दिवशी ही बाब निक्कीला माहिती पडली. त्यानंतर मुद्द्यावरून साहिल आणि निक्कीचे जोरदार भांडणही झाले. अखेर साहिलने निक्कीची हत्या करून तिचा मृतदेह स्वत:च्या ढाब्यातील फ्रीजमध्ये ठेवला आणि याची माहिती मित्र आणि स्वत:च्या कुटुंबियांना दिली. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी साहिलचे वडील, दोन भाऊ आणि दोन मित्रांना अटक केली आहे.
हेही वाचा – Delhi Murder Case : “एकत्र जगू शकत नाही, मग…”, निक्कीने साहिलसमोर ठेवल्या होत्या ‘या’ तीन अटी; पण…
असा आहे संपूर्ण घटनाक्रम
१. निक्की यादव (२४) हिने ९ फेब्रुवारी रोजी साहिलला फोन केला होता. तिला त्याच्या साखरपुड्याची माहिती मिळाली होती. निक्कीपासून लपवून त्याने दुसऱ्याच मुलीशी साखरपुडा केला होता. निक्कीला अंधारात ठेवून तो पळून जाणार होता.
२. त्याच दिवशी रात्री साहिल निक्कीच्या फ्लॅटवर आला आणि निकीला बाहेर घेऊन गेला. दोघेही साहिलच्या चुलत भावाच्या कारमधून बाहेर गेले. ही कार पोलिसांनी जप्त केली आहे.
३. साहिल आणि निक्की रात्री निजामुद्दीन आणि आनंद विहारसह अनेक ठिकाणी फिरले.
४. साहिल आणि निक्की रात्रभर कारने फिरत होते. फिरता फिरता दोघेही शहरातून पळून जाण्याचं प्लॅनिंग देखील करत होते. त्याचदरम्यान, साहिलला त्याच्या घरून फोन येऊ लागले. साहिलचे कुटुंबीय आणि नातेवाईक त्याच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. साहिल अशा वेळी रात्रभर घरी नसल्याने चिंतेने त्याच्या घरचे त्याला फोन करत होते. दरम्यान, कारमध्ये साहिल आणि निक्कीचं भांडण झालं आणि त्याने मोबाईलच्या चार्जिंग केबलने निक्कीचा गळा आवळला.
५. निक्कीची हत्या केल्यानंतर साहिल कार वेगाने पळवू लागला. काश्मीरी गेटपासून नजफगडपर्यंत ४० किमी अंतर त्याने न थांबता कार चालवली. संपूर्ण प्रवासात निक्कीचा मृतदेह कारमध्ये त्याच्या शेजारच्या सीटवर सीट बेल्टने बांधलेल्या अवस्थेत होता.
६. साहिल कार घेऊन त्याच्या ढाब्यावर गेला. तिथे कार उभी करून निक्कीचा मृतदेह त्याने कारच्या बूटमध्ये (डिक्कीमध्ये) हलवला.
७. निक्कीचा मृतदेह कारमध्ये ठेवून तो त्याच्या घरी मडोठी या गावी गेला आणि त्याच्या लग्नसोहळ्याच्या तयारीत सहभागी झाली.
८. लग्न पार पडल्यानंतर ११ फेब्रुवारी रोजी रात्री १ वाजता साहिल त्याच्या नवविवाहित पत्नीसह त्याच्या गावी गेला.
९. त्या रात्री सर्वजण झोपल्यानंतर साहिल घराबाहेर पडला. कार घेऊन तो ढाब्यावर गेला. तिथे गेल्यावर त्याने कारच्या बूटमधला मृतदेह ढाब्यातल्या फ्रीजमध्ये हलवला.
१०. त्यानंतर साहिलने निक्कीचा फोन घेतला, त्यातले दोघांचे चॅट्स आणि कॉल्स डिलीट केले आणि फोन बंद केला.