सुनंदा पुष्कर प्रकरण, कोची टस्कर्स संघाची आयपीएलमधील मालकी आणि राजकीयदृष्टय़ा वादग्रस्त विधाने यामुळे अनेकदा अडचणीत सापडलेले केंद्रीय मंत्री शशी थरूर पुन्हा एकदा नव्या वादात सापडले आहेत. याही वेळी ‘पती, पत्नी और वो’ हे वादाचे कारण आहे. शिवाय या वादाचे केंद्रस्थान शेजारील पाकिस्तानात असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
वैद्यकीय उपचारांसाठी सुनंदा पुष्कर बाहेरगावी गेल्या असताना पाकिस्तानातील ४५ वर्षीय पत्रकार मेहेर तरार हिने शशी थरूर यांच्याशी जवळीक साधली होती, तसेच आपल्या संसारात बिब्बा घालण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप सुनंदा पुष्कर यांनी केला.
ट्विटरवरील ‘ट्विप्पण्यांमुळे’ हे वाग्युद्ध सर्वासमोर आले. त्यातच पुष्कर यांनी तरार या आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या हस्तक असल्याचा आरोपही केला आहे. त्यामुळे तरार संतप्त झाल्या असून त्यांनी पुष्कर यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची धमकी दिली आहे.
लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या असताना, या वादास तोंड फुटल्याने पक्षांतर्गतही त्याचे पडसाद उमटणे स्वाभाविक आहे. मात्र असे असले तरीही, ‘आमचे वैवाहिक सहजीवन उत्तम सुरू असून अनाहूतांच्या ट्विप्पण्यांमुळे त्यात अनावश्यक तणाव निर्माण होत आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री शशी थरूर यांनी ट्विटरवर व्यक्त केली. तसेच आपल्या व्यक्तिगततेचा योग्य तो सन्मान राखला जावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
कोणत्याही विवाहित स्त्रीने आपल्या पतीवर असले आरोप करीत घटस्फोटाची भाषा वापरणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. याचा अर्थ त्या स्त्रीच्या मनांत आपल्या विवाहाबद्दल जराही सन्मानाची भावना नाही. हे असेच सुरू राहिले तर नाइलाजास्तव आपल्याला अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा लागेल, अशी प्रतिक्रिया मेहेर तरार, या पाकिस्तानातील ४५ वर्षीय पत्रकार महिलेने व्यक्त केली.

Story img Loader