काँग्रेसने हकालपट्टी केलेले नेते आचार्य प्रमोद कृष्णम हे सातत्याने काँग्रेसवर, काँग्रेसच्या विचारसरणीवर, धोरणांवर आणि राहुल गांधींसह पक्षातील नेत्यांवर टीका करत आहेत. दरम्यान, प्रमोद कृष्णम यांनी आता राहुल गांधींवर गंभीर आरोप केले आहेत. प्रमोद कृष्णम म्हणाले, काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली तर ते राम मंदिराबाबतचा निर्णय बदलतील. राम मंदिराबाबतच्या खटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तेव्हा राहुल गांधी आणि त्यांच्या जवळच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. त्या बैठकीत ठरलं की काँग्रेसचं सरकार आलं तर आपण एका शक्तीशाली आयोगाची स्थापना गठित करू. राजीव गांधी यांनी शाह बानो प्रकरणाचा निकाल ज्या पद्धतीने बदलला होता, त्याप्रमाणे राम मंदिराबाबतचा निर्णय बदलून टाकू. मी ३२ वर्षांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये होतो. त्यामुळे मी त्यांच्या चाली ओळखतो.

प्रमोद कृष्णम यांनी यापूर्वीदेखील राम मंदिराच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीका केली होती. जानेवारी २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील मंदिरात श्रीरामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. तेव्हा मंदिर समितीने काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांना या सोहळ्याचं निमंत्रण दिलं होतं. मात्र काँग्रेसने श्री राम मंदिर न्यासाने पाठवलेलं निमंत्रण स्वीकारलं नव्हतं. तेव्हादेखील प्रमोद कृष्णम यांनी काँग्रेसवर टीका केली होती.

प्रमोद कृष्णम काँग्रेसमध्ये होते तेव्हा सातत्याने काँग्रेसविरोधी वक्तव्ये करायचे. तसेच बऱ्याचदा त्यांनी भाजपाच्या धोरणांचं स्वागत केलं होतं. दरम्यान, ११ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रमोद कृष्णम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा ठपका ठेवत पक्षाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. स्वपक्षाच्याच अनेक धोरणांवर काही प्रसंगी त्यांनी टीका केली होती. आचार्य प्रमोद कृष्णम यांच्याविरोधात सातत्याने होत असलेले बेशिस्तीचे आरोप आणि ते सातत्याने जाहीरपणे पक्षाविरोधात वक्तव्ये करत असल्याने काँग्रेस पक्षाध्यक्षांनी उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीकडून सादर करण्यात आलेली शिफारस मान्य केली आहे. या शिफारशीनुसार आचार्य प्रमोद कृष्णम यांची सहा वर्षांसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. असं पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं होतं. त्यानंतर प्रमोद कृष्णम भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा होती. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मोठ्या भाजपा नेत्यांच्या भेटीगाठीदेखील केल्या होत्या. प्रमोद कृष्णम यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट हे काँग्रेसने केलेल्या कारवाईमागचं प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जातं.

हे ही वाचा >> “आनंद दिघेंनी राजन विचारेंना त्यांच्या भाषेत…”, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य; म्हणाले, “धर्मवीरच्या दुसऱ्या भागात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर प्रमोद कृष्णम म्हणाले होते, “माझ्या कोणत्या कारवाया पक्षविरोधी होत्या? प्रभू श्रीरामाचं नाव घेणं पक्षविरोधी आहे का? अयोध्येला जाणं पक्षविरोधी आहे का? अयोध्येतील राम जन्मभूमीवर आयोजित प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थिती लावणं पक्षविरोधी आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणं पक्षविरोधी आहे का?”