शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी राम मंदिरावरून चालू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केली होती. संजय राऊत म्हणाले, आगामी लोकसभा निवडणूक होईपर्यंत पंतप्रधान कार्यालय अयोध्येत हलवावं, कारण हे सरकार अयोध्येतूनच चालेल. कारण हे लोक (भाजपा) आगामी काळात रामाच्या नावाने लोकांची मतं मागतील. कधी पुलवामासारखा हल्ला घडवून आणतील तर कधी आमच्यापेक्षा मोठा रामभक्त कोणीही नाही, असं म्हणतील. राम मंदिरासाठी आम्ही, आमच्या पक्षाने आणि आमच्या लोकांनी सगळं काही दिलं आहे. प्रसंगी रक्त सांडलं आहे. आमच्या लोकांनीही बलिदान दिलं आहे. परंतु, आम्ही कधी असलं राजकारण केलं नाही, भविष्यातही असं राजकारण आम्ही करणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत यांच्या टीकेवर काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रमोद कृष्णम यांनी राऊत यांच्यासह नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्यांना टोला लगावला आहे. प्रमोद कृष्णम म्हणाले, अशी टीका होणं हे आपल्या देशाचं मोठं दुर्दैव आहे. लोकशाहीत असं काही होऊ नये. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध करा, त्यांच्या निर्णयांचा निषेध नोंदवा. परंतु, तुम्ही त्यांचा तिरस्कार करू नका. काही लोक मोदींचा तिरस्कार करण्यात स्वतःचा सत्यानाश करून घेत आहेत. विरोधी पक्षतील काही नेते असे आहेत ज्यांनी स्वतःचं सरकार पाडलं आहे. हा स्वतःचा सत्यानाशच आहे. ही मोठी नारात्मकता आहे. परंतु, मला असं वाटतं की, लोकशाहीत नकारात्मकतेला स्थान असू नये.

आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले, रामाचा विरोध करणारे हे लोक नास्तिक आहेत. त्यांना भारताच्या राजकारणात राहण्याचा अधिकार नाही. रामाचा विरोध करायचा आणि भारतात राजकारण करायचं, हे अत्यंत वाईट आहे. अशा राजकारण्यांमुळे भारतातल्या जनतेला वाईट वाटतं. आता राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. हा भारताचा उत्सव आहे. या उत्सव काळात नकारात्मकतेला थारा असू नये. ही आपली संस्कृती नाही. तसेच ज्यांना राम मंदिराच्या उद्घाटन समारंभाचं निमंत्रण मिळालं ते त्यांचं सौभाग्य आहे. निमंत्रण मिळूनही जे लोक मंदिराच्या उद्घाटनाला जाणार नाहीत हे त्यांचं दुर्भाग्य आहे.

हे ही वाचा >> IIT BHU च्या आवारात विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कारप्रकरणी तीन नराधम गजाआड, ६० दिवसांनंतर पोलिसांची कारवाई

नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काग्रेसचा तीन राज्यांमध्ये दारुण पराभव झाला. यावर प्रतिक्रिया देताना प्रमोद कृष्णम यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला होता. ते म्हणाले होते, “हा काँग्रेसचा पराभव नाही. हा डाव्या विचारसरणीचा पराभव आहे. मागच्या काही दिवसांपासून डाव्या विचारांचे लोक काँग्रेसमध्ये शिरले आहेत. काँग्रेसच्या अनेक निर्णयांवर या डाव्या नेत्यांनी प्रभाव टाकलेला आहे. हे काही नेते काँग्रेसला महात्मा गांधींच्या रस्त्यावरून हटवून वामपंथी मार्गावर नेत आहेत. महात्मा गांधींच्या सभेची सुरुवात ‘रघुपती राघव राजाराम, पतीत पावन सीताराम’ या ओळींनी व्हायची. आज त्या काँग्रेसला सनातन धर्माच्या विरोधातला पक्ष म्हणून ओळखले जातंय. हे दुर्दैवी आहे. काँग्रेसने अशा वामपंथी नेत्यांना वेळीच बाजूला केले नाही तर काँग्रेसचे अवस्था लवकरच एमआयएम या पक्षासारखी होईल.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acharya pramod krishnam slams sanjay raut says they have no right to be in indian politics asc