पीटीआय, अयोध्या
‘‘नवीन वर्ष २०२४ हे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. कारण या वर्षी अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्ला विराजमान होणार आहेत आणि देशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या दोन्ही घटनांमध्ये शुभ घडणार आहे,’’ असा विश्वास अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी मंगळवारी व्यक्त केला. अयोध्येच्या रामघाट भागातील आचार्य सत्येंद्र दास यांच्या निवासस्थानी बोलताना त्यांनी अयोध्येत सुरू असलेल्या विकासकामांची प्रशंसा केली.सत्येंद्र दास म्हणाले, की केवळ शांतता प्रस्थापित होणार नाही तर रामराज्य येणार आहे. रामलल्ला गर्भगृहात विराजमान होणार आहेत. दु:ख, वेदना, ताणतणाव सर्व संपतील आणि प्रत्येक जण आनंदी होईल. ‘रामराज्य’ हा शब्द आदर्श शासनासाठी वापरला जातो, त्याअंतर्गत प्रत्येक जण सुखी-समाधानी-आनंदी असतो.
आचार्य दास यांनी सांगितले, की नवीन वर्षांनिमित्त सर्व देशवासीयांना शुभेच्छा. रामलल्ला यांना छप्पन भोग अर्पण करून प्रसाद अर्पण केला जाईल. परंपरेनुसार दुपारी भोग आरती केली जाते. होळी, राम नवमी, बसंत पंचमी, नवीन वर्ष आणि स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिनासारख्या विशेष प्रसंगी रामलल्लांना ‘छप्पन भोग’ अर्पण केला जातो.