पीटीआय, श्रीनगर : पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट आणि बाल्टिस्तान या भागांपर्यंत पोहोचल्यानंतरच (ताबा मिळाल्यानंतरच) काश्मीरच्या संपूर्ण विकासाचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी केले. पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांवर पाकिस्तानकडून अत्याचार होत असून, त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

 श्रीनगरमध्ये आयोजित शौर्यदिन कार्यक्रमात संरक्षणमंत्र्यांनी पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्यांवर भाष्य केले. ‘‘जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांच्या संपूर्ण विकासाचे आमचे उद्दिष्ट आहे. आमचा प्रवास आता सुरू झाला आहे. हे भाग विकासाचे नवनवे उच्चांक गाठत आहेत. मात्र, गिलगिट आणि बाल्टिस्तानपर्यंत पोहोचल्यानंतरच विकासाचा उत्तरेकडे सुरू झालेला प्रवास खऱ्या अर्थाने पूर्ण होईल,’’ असे सिंह म्हणाले. पाकिस्तानच्या बेकायदा नियंत्रणाखाली असलेला भाग परत मिळवण्याबाबत १९९४ साली संसदेने केलेल्या ठरावाच्या संदर्भात त्यांनी हे विधान केले. अतिरेक्यांवर कारवाई केली की काही तथाकथित बुद्धिवादी मानवाधिकार उल्लंघनाबाबत ओरड करतात, असा आरोपही त्यांनी केला. अनुच्छेद ३७० हटवल्यामुळे काश्मिरी जनतेवरील अन्याय दूर झाल्याचा दावाही त्यांनी केला.

शौर्यदिनाबाबत..

२७ ऑक्टोबर १९४७ रोजी भारतीय वायुदलाच्या पहिल्या विमानातून १ शिख रेजिमेंटचे जवान काश्मीरमध्ये दाखल झाले. त्यानिमित्त श्रीनगरमधील वायुदलाच्या जुन्या तळावर (बडगाम तळ) दरवर्षी शौर्यदिन साजरा होतो. स्वतंत्र भारताची ही पहिली लष्करी मोहीम होती. यामुळेच १९४७-४८च्या युद्धाचे पारडे भारताच्या बाजूने फिरल्याचे मानले जाते.

पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांवर पाकिस्तानकडून अत्याचार सुरू आहे. मानवाधिकारांबाबत नक्राश्रू ढाळणाऱ्या पाकिस्तानने या नागरिकांच्या मानवाधिकार उल्लंघनाबाबत उत्तर द्यायला हवे.

-राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

Story img Loader