गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावर २००२ साली झालेल्या हल्ल्याप्रकरणी ११ वर्षे तुरूंगात घालवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने २०१४ साली चांद खान उर्फ शान खानला निर्दोष सोडले होते. परंतु चांद खानला आता पुन्हा एकदा तुरूंगाची हवा खावी लागली आहे. यावेळी तो गोहत्येच्या आरोपाखाली तुरूंगात आहे. विशेष म्हणजे अक्षरधाम हल्ल्याप्रकरणी २००६ साली कनिष्ठ न्यायालयाने चांद खानला दोषी धरत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. गुजरात उच्च न्यायालयानेही त्याची शिक्षा कायम ठेवली होती. मे २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यासह पाच जणांची निर्दोष मुक्तता केली. गुजरातमधील साबरमती तुरूंगातून बाहेर येऊन तो उत्तर प्रदेशातील बरेली येथे आपल्या कुटुंबीयांबरोबर राहू लागला. परंतु तो पुन्हा जून महिन्यापासून पिलीभीत तुरूंगात आहे. पिलीभीत येथील बिसलपूर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गोहत्ये कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
नवाडिया सितारगंज येथे कारमधून ५०० किलो गो मांस घेऊन जाताना शान खान याच्यासह अतिक आणि फैजान या त्याच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यानेच आपले नाव शान खान असून अक्षरधाम मंदिर हल्ल्याप्रकरणी आपण अटकेत होतो याची माहिती दिली. शान खानला जाणूनबुजून या प्रकरणात अडकवल्याचा आरोप खानचे कुटुंबीय करत आहेत. तर पोलिसांनी चांद व शान खान या एकच व्यक्ती असल्याचे म्हटले आहे.
२५ सप्टेंबर २००२ मध्ये दोन दहशतवाद्यांनी अक्षरधाम मंदिरावर हल्ला केला हेाता. यामध्ये ३३ मृत्यूमुखी तर ८६ जण जखमी झाले होते. राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (एनएसजी) च्या कमांडोंजनी या अतिरेक्यांना नेस्तनाबूत केले हेाते. चांद खानला १२ सप्टेंबर २००३ मध्ये या प्रकरणी अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला दोन्ही दहशतवाद्यांना अहमदाबादमध्ये आणून त्यांना शहर दाखवल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवले होते. नंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याला निर्दोष ठरवले होते.
२०१४ मध्ये तुरूंगातून बाहेर आल्यानंतर चांद खानने टॅक्सी चालवण्याचे काम सुरू केले होते, अशी माहिती चांद खानचा भाऊ ताहिर खानने दिली. जून महिन्यात तो दोन लोकांना टॅक्सीमधून पिलीभीतला घेऊन जात होता. रस्त्यात पोलिसांनी त्याची गाडी थांबवली आणि चौकशीसाठी नेले. त्यानंतर त्याच्यावर गोहत्ये प्रकरणी गुन्हा दाखल केला, असेही ताहिर खानने सांगितले. पोलीस आमच्या कुटुंबीयांना त्रास देत असून त्यामुळे आमच्या मुलींच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा