पीटीआय, नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरणातील कथित अनियमिततांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराबाबत सुरू असलेल्या तपासाच्या संबंधात ‘आप’चे खासदार संजय सिंह यांच्याशी संबंधित काही लोकांच्या घरी आणि इतर ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी नव्याने छापे घातले. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींन्वये घालण्यात येत असलेल्या या छाप्यांमध्ये सुमारे सहा संस्थांवर हे छापे घालण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात गुंतलेल्या काही आरोपींच्या चौकशीत मिळालेल्या नव्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. ज्यांच्यावर छापे घालण्यात येत आहेत, त्यांच्यापैकी काही जण सिंह यांच्याशी संबंधित असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 राज्यसभेचे खासदार असलेले संजय सिंह यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय वित्त सचिवांना पत्र लिहून, ईडीचे संचालक, एक सहायक संचालक आणि मद्य धोरण प्रकरणातील एक तपास अधिकारी यांनी या तपासाच्या संबंधात आपल्याविरुद्ध कथितरीत्या ‘खोटे व अपमानास्पद दावे’ केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध खटला भरण्याची परवानगी मागितली होती. यानंतर, आरोपपत्रातील संजय सिंह यांच्या नावाशी संबंधित ‘टायपोग्राफिकल/क्लेरिकल एरर’ दुरुस्त करण्यासाठी ईडीने २० एप्रिलला न्यायालयात अर्ज दाखल केला होता, असे सूत्रांनी सांगितले. आरोपपत्रात संजय सिंह यांचे नाव चार वेळा आले असून, यापैकी एका ठिकाणी त्यांचे नाव राहुल सिंह यांच्याऐवजी ‘चुकीने’ टाइप झाले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सिसोदिया यांचा अंतरिम जामीन अर्ज मागे

नवी दिल्ली : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अंतरिम जामिनासाठी केलेला अर्ज बुधवारी मागे घेतला. पत्नीची प्रकृती बरी नसल्याच्या कारणावरून त्यांनी अंतरिम जामीन मागितला होता. मात्र आता पत्नीची प्रकृती स्थिर असल्यामुळे त्यांनी अर्ज मागे घेतला. दिल्लीमधील कथित अबकारी धोरण अंमलबजावणी घोटाळाप्रकरणी मनीष सिसोदिया सध्या तिहार तुरुंगात आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप आहेत. सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) त्यांची चौकशी सुरू आहे.

सिसोदिया यांनी विविध कारणांवरून नियमित आणि अंतरिम जामीन मिळण्यासाठी याचिका दाखल केल्या आहेत. सीबीआयच्या खटल्यामध्ये त्यांच्या नियमित जामीन अर्जावरील आदेश राखीव असल्यामुळे आणि त्यांच्या पत्नीची प्रकृती स्थिर असल्यामुळे अंतरिम जामीन अर्ज मागे घेत असल्याचे त्यांचे वकील मोहित माथूर यांनी सांगितले. त्याला न्या. दिनेश कुमार शर्मा यांनी परवानगी दिली. मात्र, सीबीआय आणि ईडीची बाजू मांडणाऱ्या अतिरिक्त महान्याय अभिकर्ता एस व्ही राजू यांनी यावर आक्षेप घेतला. ते म्हणाले की, हा केवळ जामीन अर्ज मागे घेण्याचा प्रकार नाही तर सिसोदिया यांच्या पत्नीला तुरुंगातून घरी पाठवण्यात आले आहे ही बाब त्यांनी जाणूनबुजून न्यायालयापासून लपवली. मात्र, कोणत्याही वादामध्ये न पडता अर्ज मागे घेण्यास परवानगी दिली जात आहे असे न्यायालयाने स्पष्ट केले.