पीटीआय, सिएटल (अमेरिका) : पोलिसांच्या वाहनाच्या धडकेमुळे मृत्युमुखी पडलेल्या जान्हवी कंडुला या भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची खिल्ली उडवणाऱ्या अमेरिकेतील सिएटलच्या पोलीस अधिकाऱ्याला गस्तीसेवेतून हटवण्यात आले आहे. अमेरिकेतील दक्षिण आशियाई वंशाच्या समुदायाने या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले.
‘सिएटल टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, जानेवारीत सिएटलमध्ये जान्हवी या २३ वर्षीय भारतीय विद्यार्थिनीचा पोलीस गस्ती पथकातील भरधाव वेगातील वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला होता. जान्हवीच्या मृत्यूनंतर हा अधिकारी हसताना आणि खिल्ली उडवत असताना ध्वनिचित्रफितीद्वारे समोर आले. या संदर्भात सिएटल पोलिसांनी ‘ई मेल’द्वारे स्पष्ट केले, की डॅनियल ऑडरर याला गस्ती पथकातून हटवून दुसऱ्या पदावर नियुक्त केले आहे.
जान्हवीला धडक देणारे वाहन केव्हिन डेव्ह हा पोलीस अधिकारी चालवत होता. तो ताशी ११९ किलोमीटर वेगाने गाडी चालवत होता आणि या वाहनाच्या धडकेनंतर जान्हवी १०० फुटांपेक्षा जास्त अंतरावर फेकली गेली. या महिन्याच्या सुरुवातीला, सॅन फ्रान्सिस्कोतील भारतीय वाणिज्य दूतावासाने कंडुलाच्या मृत्यू प्रकरण ज्या पद्धतीने पोलिसांनी हाताळले, त्याबद्दल नाराजी आणि चिंता व्यक्त केली होती.