एक्सप्रेस वृत्त, रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात लाभाच्या पदाचा गैरवापर केल्याबद्दल कोणत्याही क्षणी कारवाई होऊ शकते, असे संकेत राज्यपाल रमेश बैस यांनी दिले आहेत. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबाबत प्रश्न विचारला असता, ‘‘झारखंडमध्ये अणूबॉम्ब कोणत्याही क्षणी फुटू शकतो,’’ असे उत्तर त्यांनी दिले.

निवडणूक आयोगाने सोरेन यांच्याबाबत राज्यपालांना अहवाल दिला असून त्यांना अपात्र करण्याची सूचना केल्याचे सांगितले जात आहे. आता आपण ‘दुसरे मत’ मागवले असल्याचे राज्यपालांनी सांगितल्यामुळे कारवाईबाबत गूढ वाढले आहे. राजभवनातील सूत्रांनी मात्र असे दुसरे मत मागवण्यासाठी अहवाल पाठवला जाऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. भाजप सत्ताधारी पक्षांना फोडून सरकार उलथवण्याच्या प्रयत्नात असून त्यामुळेच या प्रकरणी वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप झामुमो-काँग्रेस आघाडीने केला आहे.

प्रकरण काय?

२५ ऑगस्टला निवडणूक आयोगाने राज्यपालांना अहवाल पाठवला आहे. त्यात सोरेन यांनी स्वत:कडेच खाते असताना खाणकामाचे कंत्राट स्वत:ला घेतल्याचा ठपका ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र झामुमोकडून सातत्याने मागणी होऊनही अद्याप या अहवालातील तपशील उघड करण्यात आलेला नाही.

Story img Loader