काही दिवसांपूर्वीच केरळमध्ये एका युवकाला खाण्याचे पाकिट चोरल्याप्रकरणी जमावाने बेदम मारहाण केली होती. ही मारहाण इतकी भयंकर होती की त्यातच मधूचा मृत्यू झाला. मधूला भूक लागल्याने त्याने एका दुकानातून खाद्यपदार्थाचे पाकिट चोरले होते. या चोरीची किंमत त्याला त्याचा जीव गमावून चुकवावी लागली. मात्र याच युवकाच्या आईच्या मदतीला धावला आहे तो क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग. वीरेंद्र सेहवागने या मधूच्या आईसाठी दीड लाख रुपयांचा धनादेश पाठवला आहे. सामाजिक कार्यकर्ते राहुल इस्वर यांनी ही बाब एएनआयला सांगितली. तसेच मी काही दिवसातच हा धनादेश मधूच्या आईला नेऊन देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

खाद्यपदार्थाच्या पाकिटाची चोरी केल्याप्रकरणी मधूला जी अमानुष मारहाण जमावाने केली त्यातच त्याचा मृत्यू झाला. यानंतर सोशल मीडियावर या घटनेवरून चर्चा आणि वाद रंगला. या वादात वीरेंद्र सेहवागचाही सहभाग होता. मधूची हत्या करणाऱ्या जमावावर वीरेंद्र सेहवागने टीका केली होती. मात्र त्यानंतर सेहवागला अनेकांनी या टीकेवरून ट्रोलही केले होते. कारण आपल्या ट्विटमध्ये या तरूणाला झालेल्या मारहाणीप्रकरणी मुस्लिम समाजातल्या तिघांवरच सेहवागने आरोप केले होते. यानंतर अनेक नेटकऱ्यांनी सेहवाग मधूच्या मृत्यूचे राजकारण करत असल्याची टीका केली होती. तसेच सेहवागला ट्रोलही केले होते.

या घटनेला काही दिवस लोटल्यावर वीरेंद्र सेहवागने त्याच्या माणुसकीतले दर्शन घडवत मधू या आदिवासी तरूणाच्या आईला दीड लाख रूपयांचा धनादेश पाठवला आहे. राहुल इस्वर हे ११ एप्रिलला हा धनादेश मधूच्या आईला देतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Story img Loader