दिल्लीत ९ आणि १० सप्टेंबरला जी-२० शिखर परिषदची बैठक पार पडत आहे. या बैठकीसाठी येणाऱ्या जागतिक नेत्यांच्या स्वागतासाठी दिल्ली सज्ज आहे. रस्ते, चौक आणि उद्यानं सगळीकडं सजावटीसह रंगरंगोटी केली आहे. पण, दिल्लीतील भटक्या कुत्र्यांना पकडण्यात येत असल्याचा दावा प्राणीमित्र आणि संबंधित संघटनांकडून केला जात आहे. यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या पद्धतीवर प्राणीमित्र आणि ‘हाऊस ऑफ स्ट्रे अ‍ॅनिमल्स’ ( एचएसए ) दवाखान्याचे प्रमुख संजय महापात्रा यांनी आक्षेप नोंदवला आहे. “भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या ( एडब्लूबीआय ) मार्गदर्शक तत्वांनुसार कुत्र्यांना स्थलांतरित करण्यासाठी फक्त जाळीचा वापर केला पाहिजे,” असं महापात्रा यांनी म्हटलं आहे.

मात्र, नवी दिल्ली महानगरपालिकेनं हा आरोप फेटाळला आहे. महापालिकेचे उपमहापौर सतीश उपाध्याय यांनी म्हटलं, “कुत्र्यांना स्थलांतरित करताना कोणत्याही क्रूर पद्धतीचा वापर केला नाही. महापालिकेनं भटक्या कुत्र्यांना सांभाळणारे आणि त्यांना अन्न पुरवठा करणाऱ्यांबरोबर बैठक घेतली होती. त्यांनी कुत्र्यांची काळजी घेण्याचं मान्य केलं होतं.” याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिलं आहे.

‘पिपल्स फॉर अ‍ॅनिमल्स’नेही इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत दिल्ली महापालिकेला प्रश्नांची सरबत्ती केली आहे. “जी-२० शिखर परिषदची बैठक नवी दिल्लीत आहे. मग, दिल्ली महापालिकेच्या पूर्व आणि पश्चिम क्षेत्रातील कुत्र्यांना का पकडलं जात आहे? नसबंदी केलेल्या कुत्र्यांना पडकलं जाऊ शकत नाही. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सर्व महापालिकांना ‘एडब्लूबीआय’च्या मार्गदर्शानाखाली नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. केवळ जाळीचा वापर करण्याची परवानगी असताना दिल्ली पालिका तारांच्या माध्यमातून कुत्र्यांना का पकडलं जात आहे?” असे प्रश्न ‘पिपल्स फॉर अ‍ॅनिमल्स’ने उपस्थित केले आहेत.