Kangana Ranaut Reaction on Kunal Kamra Controversy : विनोदी कलाकार कुणाल कामरा प्रकरणी पोलिसांनी समन्स बजावला असून त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. परंतु, तो चौकशीला आज हजर राहिला नाही. दरम्यान, आता याप्रकरणी खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कुणाल कामराविषयी संताप व्यक्त केला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी संसदेत आलेल्या कंगना रणौत यांच्याशी न्यूज १८ ने संवाद साधला. त्यावेळी कंगना रणौत म्हणाल्या, “माझं अनधिकृत बांधकाम पाडल्यानंतर त्याची मस्करी केली गेली. त्या प्रकरणाशी मी हे प्रकरण अजिबात जोडणार नाही. कारण ते एक अनधिकृत बांधकाम होतं.”

त्या पुढे म्हणाल्या, “ज्या लोकांना स्वतःची इज्जतच सर्व काही आहे, त्यांची तुम्ही विनोदाच्या नावाखाली चेष्टा करताय, त्यांची अपकिर्ती करताय, त्यांच्या कामाचा अनादर करताय. एकनाथ शिंदे कधीकाळी रिक्षा चालवत होते, आज ते स्वतःच्या जीवावर पुढे आले आहेत. चेष्टा करणारे हे लोक कोण आहेत? ज्यांनी आयुष्यात काहीही केलं नाही. दोन मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी कोणी अशी चेष्टा मस्करी करत असेल तर आपला समाज कुठे चाललाय याचा विचार करावा लागेल.”

काय आहे नेमकं प्रकरण?

कुणाल कामराच्या शोमध्ये एकनाथ शिंदे व त्यांच्या शिवसेनेबाबत गाणं सादर करण्यात आल्यानंतर त्यावर शिंदे गटाकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. कुणाल कामराचा शो झाला त्या हॅबिटॅट क्लबच्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आली. विधानसभेतही खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामरानं अशा प्रकारे एकनाथ शिंदेंचा अवमान करणं सहन केलं जाणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली. 

दरम्यान, खार पोलिसांनी आज कुणाल कामराला चौकशीसाठी बोलावलं होतं. परंतु, तो मुंबईतच नसल्याने तो चौकशीला हजर राहू शकला नाही.