पठाणकोट हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध ताणलेले असतानाच पाकिस्तानने कराचीत शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या साहित्य महोत्सवासाठी बॉलिवूड अभिनेते व भाजप समर्थक अनुपम खेर यांना व्हिसा नाकारला आहे. इतर सतरा भारतीय निमंत्रितांना मात्र व्हिसा देण्यात आला असून त्यात सलमान खुर्शीद व नंदिता दास आदींचा समावेश आहे.
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाने केलेल्या दाव्यानुसार खेर यांनी व्हिसासाठी अर्जच केला नव्हता. कराचीतील चार दिवसांच्या साहित्य महोत्सवासाठी आयोजकांनी १८ भारतीयांना निमंत्रित केले होते त्यात अनुपम खेर यांचा समावेश होता पण खेर यांनाच व्हिसा नाकारण्यात आला आहे. ज्या इतर सतरा जणांना व्हिसा मिळाला आहे, त्यात काँग्रेस नेते सलमान खुर्शीद व नंदिता दास यांचा समावेश आहे. अनुपम खेर यांना सरकारने अलिकडेच पद्मभूषण सन्मान दिला आहे. खेर यांनी सांगितले, की या घटनेबाबत आपल्याला खेद वाटतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेला पाठिंबा व काश्मिरी पंडितांचा उपस्थित केलेला मुद्दा, देशभक्ती या कारणाने व्हिसा नाकारला असावा अशी शंका वाटते. मला या निर्णयाचे वाईट वाटते. अनेकांना व्हिसा दिला पण मलाच दिला नाही. आम्ही त्यांच्या कलाकारांचे भारतात स्वागत करतो. माझ्या कलेचे भारतात स्वागत होत असेल, तर ती इतर ठिकाणीही स्वागतार्हच असली पाहिजे.
पाकिस्तानी उच्चायुक्तालयाशी संपर्क साधला असता माध्यम प्रमुख मंझूर मेमन यांनी सांगितले, की अनुपम खेर यांनी उच्चायुक्तालयाकडे व्हिसासाठी अर्जच पाठवले नाही त्यामुळे त्यांना व्हिसा देण्याचा प्रश्नच येत नाही. कराची साहित्य महोत्सवाच्या आयोजकांनी सांगितले, की व्हिसा नाकारण्याची कारणे आम्हालाही माहिती नाहीत. साहित्य महोत्सवाच्या प्रवक्तया अमीना सय्यद यांनी सांगितले, की पाकिस्तानच्या भारतातील उच्चायुक्तालयाने खेर यांना व्हिसासाठी अर्ज न करण्याबाबत सांगण्याचा सल्ला आम्हाला दिला होता, त्यांना व्हिसा दिला जाणार नाही, इतर सतरा जणांना अर्ज करू द्या त्यांना व्हिसा दिला जाईल, असेही उच्चायुक्तालयाने आधीच सांगितले होते. पाकिस्तानातील एका स्वयंसेवी संस्थेने निमंत्रण देऊनही गेल्या मे महिन्यात सुद्धा खेर यांना व्हिसा नाकारण्यात आला होता.
व्हिसासाठी अर्जच केला नाही, हा पाकिस्तानचा दावा फेटाळताना खेर यांनी सांगितले, की त्यांचे स्पष्टीकरण हास्यास्पद आहे कारण संयोजकांनी सर्व सोपस्कार पूर्ण केले होते. त्यांनी व्हिसा नाकारण्याची कारणे मला माहिती नाहीत. कदाचित मी त्या देशात जाऊन भारतावर टीका करीत नाही म्हणून किंवा इतर लाखो कारणांनी त्यांनी व्हिसा नाकारला असेल.
कराचीतील पाकिस्तान सरकारशी संबंधित सूत्रांनी सांगितले, की अनुपम खेर हे समाजमाध्यमांवर भारत-पाक संबंधांबाबत सतत मते मांडत असतात त्यामुळे त्यांना व्हिसासाठी अर्ज करू नये असे सांगण्यात आले होते. कराची साहित्य महोत्सवात अमेरिका, ब्रिटन, बांगलादेश, भारत यासह ३५ देशांतील निमंत्रित येत आहेत. व्हिसा नाकारल्याबाबत त्यांनी सांगितले, की संयोजकांनी १७ जणांची कागदपत्रे व्हिसासाठी सादर केली व माझीच सादर केली नाहीत असे शक्य नाही कारण त्यांनी त्यांच्या पोस्टर्समध्ये माझे नाव टाकले आहे. त्यामुळे संयोजकांनीच अर्ज करायचा होता, मी करणे अपेक्षित नव्हते त्यामुळे पाकिस्तान उच्चायुक्तालय खोटे बोलत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा