महात्मा गांधींना कुणीही ओळखत नव्हतं. त्यांच्यावर चित्रपट आला आणि जगात त्यांची ओळख निर्माण झाली. जगभरात त्यांचे विचार पोहचवण्यासाठी ७५ वर्षांत काहीही झालं नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले आहेत. या वक्तव्यावरुन राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उत्तर दिलं आहे. तर अभिनेते प्रकाश राज यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना याच वक्तव्यावरुन सवाल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधींबाबत काय म्हणाले?

“महात्मा गांधी एक मोठं व्यक्तिमत्त्व होतं. आपण जगभरात त्यांची ओळख निर्माण करायला हवी होती. ही आपली जबाबदारी होती. मात्र, आपण त्यात अपयशी ठरलो. त्यांना कोणी ओळखत नव्हतं. ज्यावेळी महात्मा गांधींवर पहिल्यांदा चित्रपट बनला तेव्हा जगभरात गांधी कोण होते? याबाबत कुतूहल निर्माण झालं. त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी आपण ७५ वर्षात काहीही केलं नाही”

हे पण वाचा- “एंटायर पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यालाच…”; महात्मा गांधींबाबत केलेल्या विधानावरून राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला!

“जगभरात जर मार्टिन ल्यूथर किंग आणि नेल्सन मंडेलांना ओळखलं जाते. मात्र, गांधी त्यांच्यापेक्षा कमी नव्हते. मी संपूर्ण जग फिरलो आहे. मात्र, गांधींना किंवा गांधींच्या माध्यमातून भारताला जी ओळख मिळायला हवी होती, ती मिळाली नाही. आज जगभरातील अनेक समस्यांचे समाधान गांधींच्या विचारांत आहे. आपण खूप काही गमावलं आहे.” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गांधींबाबत प्रतिक्रिया दिली. मात्र प्रकाश राज यांनी या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.

प्रकाश राज यांची पोस्ट काय?

प्रकाश राज यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये ते म्हणतात, ” पंतप्रधान नरेंद्र मोदी सर, हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे. तुम्ही जर शाळेत गेला असतात तर तुम्हाला महात्मा गांधींबाबत समजलं असतं. ज्या व्हॉट्स अॅप युनिव्हर्सिटीतून ज्ञान मिळवता त्याच्या कक्षा थोड्या रुंदावल्या पाहिजेत” असं म्हणत हा व्हिडीओ प्रकाश राज यांनी पोस्ट केला आहे. महात्मा गांधींनी युरोपचा दौरा केला होता, तसंच त्यांना पाहण्यासाठी गर्दी झाली होती. महात्मा गांधी जेव्हा पॅरीसला गेले तेव्हा त्यांचे विचार ऐकण्यासाठी तिथे गर्दी झाली होती. महात्मा गांधी अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली या देशांमध्येही गेले होते. ही सगळी माहिती देणारा हा व्हिडीओ आहे. तसंच ३० जानेवारी १९४८ या दिवशी त्यांची हत्या झाली तेव्हा जगभरात बातम्या आल्या होत्या असंही या व्हिडीओत सांगण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत प्रकाश राज यांनी मोदींना तुम्ही शाळेत का गेला नाहीत? असा प्रश्न विचारला आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

राहुल गांधी यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत मोदींच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. “महात्मा गांधींबद्दल जाणून घेण्यासाठी केवळ एंटायर पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यालाच चित्रपट बघावे लागतील”, असा टोला त्यांनी लगावला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor prakash raj posted video on social media and criticized narendra modi over his statement on mahatma gandhi scj