‘कोब्रा पोस्ट’चा दावा ,‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये ३८ कलाकारांची नावे उघड

नवी दिल्ली : पैशांच्या मोबदल्यात समाजमाध्यमांवर राजकीय पक्षांचा छुपा प्रचार करण्याची तयारी दाखवणाऱ्या तब्बल ३८ बॉलिवुड आणि टीव्ही कलाकारांचा ढोंगीपणा शोध पत्रकारिता करणाऱ्या ‘कोब्रा पोस्ट’ या वृत्त संकेतस्थळाने मंगळवारी उघड केला. त्यासाठी ‘कोब्रा पोस्ट’ या कलाकारांचे स्टिंग ऑपरेशन केले असून त्यात ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांचे गुणगान करणे वा एखाद्या पक्षाच्या नेत्याची बदनामी करण्याचे कलाकारांनी मान्य केले. या ‘मदती’साठी त्यांनी दोन लाखांपासून वीस कोटींपर्यंत रक्कम मागितल्याचा दावा ‘कोब्रा पोस्ट’ने केला आहे.

‘कोब्रा पोस्ट’ने मंगळवारी ‘स्टिंग ऑपरेशन’ची एक तासाची चित्रफीत पत्रकारांना दाखवली. प्रसिद्ध गायक, बॉलिवुड आणि टीव्ही कलाकार, विनोदवीर अशी तब्बल तीन डझन सेलिब्रिटींशी संपर्क साधण्यात आला. जनसंपर्क क्षेत्रातील कंपनीचे प्रतिनिधी म्हणून ‘कोब्रा पोस्ट’च्या दोन बातमीदारांनी मध्यस्थांमार्फत या कलाकारांकडून पक्षांच्या प्रचारासाठी करार करण्यासाठी मान्यताही घेतली. काही कलाकारांनी हा बनावट करार करण्याआधीच आपल्या ट्विटर खात्यावर पक्षांचा प्रचार सुरू केला.

बहुतांश कलाकारांनी काळा पैशाविरोधात केंद्र सरकारच्या धोरणाचे समर्थन करताना नोटबंदीला पाठिंबा दिला होता. मात्र, हा बनावट करार करताना ‘मोबदला’ मात्र रोख मागितला. काहींनी १० टक्के तर काहींनी ९० टक्के रक्कम रोख देण्याची मागणी केली. बनावट ‘पीआर’ कंपनीच्या बनावट प्रतिनिधींचा प्रस्ताव या कलाकारांनी उत्साहाने स्वीकारला. काहींनी अन्य कलाकारांशी स्वतहून संपर्क करून दिला.

किमान एक महिना आणि कमाल आठ महिने समाजमाध्यमांवर कोणताही मजकूर ‘पोस्ट’ करण्याची तयारी त्यांनी दाखवली. बलात्कारापासून पूल कोसळण्याच्या घटनांपर्यंत कोणत्याही वादग्रस्त मुद्दय़ावर पक्षांच्या समर्थनार्थ ‘स्वतचे मत’ ट्विटर वा फेसबुकवर व्यक्त करण्यास त्यांनी कोणतेही आढेवेढे घेतले नाहीत.

भाजप, आप, काँग्रेस या प्रमुख तीन राजकीय पक्षांचा प्रचार करण्यास या कलाकारांना सांगितले गेले. त्यातील बहुतांश जणांनी भाजपचा प्रचार करण्यास होकार दिला. जो मजकूर कंपनी देईल तो   ट्विटर, फेसबुकवर अपलोड करण्यावर कोणीही आक्षेप घेतला नाही. महिन्याभरात किती ट्विट वा फेसबुक पोस्ट टाकायच्या यावर ‘मोबदल्या’ची रक्कम ठरवली गेली. काहींनी स्वतहून मजकूरच नव्हे तर, चित्रफीतही अपलोड करण्याची कल्पना मांडली.

छुप्या पद्धतीने जनमत कसे निर्माण केले जाऊ शकते हे ‘स्टिंग ऑपरेशन’मधून उघड होते, असे ‘कोब्रा पोस्ट’ अनिरुद्ध बहल यांनी सांगितले. स्टिंग ऑपरेशन केलेल्या प्रत्येकाला प्रश्नावली पाठवून त्यांचा प्रतिसाद ‘कोब्रा पोस्ट’ने मागवला असून ते संकेतस्थळावर अपलोड केले जातील, असेही बहल यांनी सांगितले.

तीन डझन कलाकार

गायक : अभिजित भट्टाचार्य, कैलाश खेर, मिका सिंग आणि बाबा सहगल

विनोदवीर : राजू श्रीवास्तव, सुनील पाल, राजपाल यादव, उपासना सिंह, कृष्णा अभिषेक, विजय इश्वरलाल

नृत्य दिग्दर्शक-कलाकार : गणेश आचार्य, संभावना सेठ.

अभिनेते/ अभिनेत्री जॅकी श्रॉफ, शक्ती कपूर, विवेक ओबेरॉय, सोनू सूद, अमिषा पटेल, महिमा चौधरी, श्रेयश तळपदे, पुनीत इस्सार, सुरेंद्र पाल, पंकज धीर, निकितीन धीर, टिस्का चोप्रा, दीपशिखा नागपाल, अखिलेंद्र मिश्रा, रोहित रॉय, राहुल भट, सलीम झैदी, राखी सावंत, अमन वर्मा, हितेन तेजवाणी, गौरी प्रधान, एव्हलीन शर्मा, मनिषा लांबा, कोयना मित्रा, पूनम पांडे, सनी लिओनी.

फक्त चौघांचा नकार : विद्या बालन, अर्शद वारसी, रझा मुराद आणि सौम्या टंडन या चार कलाकारांनी मात्र ‘प्रचारमोहिमे’त सहभागी होण्यास नकार दिला. कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे या चारही कलाकारांनी स्पष्ट केल्याचे ‘कोब्रा पोस्ट’ने म्हटले आहे.

Story img Loader