नव्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो तसाच ठेवत दुसऱ्या बाजूने लक्ष्मी मातेचा आणि गणपतीचा फोटो छापण्यात यावा, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक नेते प्रतिक्रिया देत आहेत. भाजपा नेते राम कदमांनी नोटांवर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, वीर सावरकर यांचे फोटो नोटांवर छापावेत, अशी मागणी केली. तर नितेश राणेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो छापण्याची मागणी केली होती. अशातच आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढविणारी अभिनेत्री गुल पनाग हिने या प्रकरणावरून एक ट्वीट केलंय.
“नव्या नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापा,” केजरीवालांची पंतप्रधान मोदींकडे मागणी, सांगितलं कारण
“हे खरंच शेवट आहे की शेवटापर्यंत जाण्याचं माध्यम? सगळ्याच गोष्टींमध्ये धर्म आणण्याचा खेळ आता सगळेच खेळतील. फक्त राजकारणीच नाही! जे असहमत आहेत, त्यांनी राज्यघटना धुंडाळत राहावी. पण त्याचा फारसा उपयोग होणार नाही”, असं ट्वीट गुल पनागने केलंय.
काय म्हणाले होते अरविंद केजरीवाल?
“एका बाजूला गांधीजींचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मीजी आणि गणपतीचा फोटो असेल तर संपूर्ण देशाला त्यांचे आशीर्वाद मिळतील. लक्ष्मी जी भरभराट आणि समृद्धी आणतात तर गणपती सर्व अडथळे दूर करतात, त्यामुळे या दोघांचे फोटो नोटांवर छापण्यात यावे. मी सर्व नोटा बदलण्याबाबत बोलत नाहीये, परंतु ज्या नोटा नव्याने छापल्या जातील, त्यावर लक्ष्मीजी आणि गणपतींचे फोटो छापण्यात यावे,” असं केंद्र सरकारला आवाहन करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले होते.