नुकतीच काँग्रेस पक्षाने देशातील विविध राज्यांमधून पक्षाच्या राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर काँग्रेसमधील काही इच्छुकांनी नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. यात काँग्रेसच्या नेत्या आणि अभिनेत्री नगमा यांचाही समावेश आहे. चित्रपट क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या अभिनेत्री नगमा यांनी २००४ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांना स्वतः सोनिया गांधी यांनी राज्यसभेचं वचन दिलं. मात्र, १८ वर्षांनंतरही या वचनाची पुर्तता झाली नसल्याचं म्हणत नगमा यांनी नाराजी व्यक्त केली.
राज्यसभेसाठी संधी न मिळाल्याने नगमा यांनी नाराज होत दोन ट्वीट केले. यातील पहिल्या ट्वीटमध्ये त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांचं ट्वीट रिट्विट करत आपली १८ वर्षांची तपस्या इम्रान भाईंसमोर कमी पडल्याचं मत व्यक्त केलं. पवन खेरा यांनी काँग्रेसची यादी जाहीर झाल्यानंतर केलेल्या ट्वीटमध्ये कदाचित माझी तपस्या काहिशी कमी पडल्याचं ट्वीट केलं होतं.
“मी राज्यसभेसाठी पात्र नाही का?”
नगमा यांनी आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं, “काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून मी २००३-०४ काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. तेव्हा सोनिया गांधी यांनी स्वतः मला राज्यसभेचं आश्वासन दिलं होतं. त्यावेळी काँग्रेस पक्ष सत्तेतही नव्हता. आता या गोष्टीला १८ वर्षे झालेत मात्र त्यांना अद्याप एकही संधी सापडलेली नाही. इमरान यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर घेण्यात आलं. मी पात्र नाही का असा माझा सवाल आहे.”
महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगढी यांना काँग्रेसची उमेदवारी
राज्यातील राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसने अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी जाहीर केल्याने राज्यातील पक्षाच्या नेत्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. राज्याबाहेरील नेत्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्याची परंपरा काँग्रेसने यंदाही कायम ठेवली.
राज्यातील राज्यसभा निवडणुकीत संख्याबळाच्या आधारे काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. पक्षाने विद्यमान खासदार पी. चिदम्बरम यांना तमिळनाडूत उमेदवारी दिली. महाराष्ट्रातून कवाली गायक व प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी दिली आहे. प्रतापगढी यांची उमेदवारी रविवारी सकाळीच निश्चित करण्यात आली तेव्हा राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दुसरा उमेदवार देण्याची मागणी दिल्लीत केली होती.
विशेषत: अल्पसंख्याक विभागाच्या नेत्यांनी राज्याबाहेरील अल्पसंख्याक उमेदवार उभा करण्यास विरोध दर्शविला होता. परंतु पक्ष नेतृत्वाने नेहमीप्रमाणेच राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत बाहेरचा उमेदवार लादला. मुकूल वासनिक यांना राज्यातून उमेदवारी देण्याचे प्रस्तावित होते. परंतु राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी इम्रान प्रतापगढी यांच्या नावाला विरोध दर्शविल्याने वासनिक यांना राजस्थानातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याऐवजी प्रतापगढी यांना राज्यातून उमेदवारी देण्यात आल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले.
जी -२३ या बंडखोर गटातील गुलामनबी आझाद आणि आनंद शर्मा यांची उमेदवारी पक्षाने पहिल्या यादीत तरी जाहीर केलेली नाही. एका बडय़ा उद्योगपतीच्या माध्यमातून राज्यातून पुन्हा राज्यसभेवर जाण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या राजीव शुक्ला यांना छत्तीसगडमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
बाहेरच्या उमेदवाराची परंपरा कायम
काँग्रेसने आतापर्यंत विश्वजीत सिंग व राजीव शुक्ला,(प्रत्येकी दोनदा) पी. चिदम्बरम व गुलामनबी आझाद या बाहेरच्या राज्यातील नेत्यांना राज्यातून राज्यसभेवर पाठविले आहे. भाजपनेही केरळातील पी. मुरलीधरन यांना २०१८ मध्ये राज्यातून राज्यसभेवर पाठविले आहे.
सोनिया व राहुल यांच्या निष्ठावानांना संधी
भाजपपाठोपाठ काँग्रेसनेही राज्यसभेच्या निवडणुकीसाठी १० उमेदवारांची नावे जाहीर केली. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे विश्वासू जयराम रमेश यांना कर्नाटकमधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. राहुल गांधी यांचे निष्ठावान अजय माकन व रणदीप सुरजेवाला यांना अनुक्रमे हरियाणा व राजस्थानमधून उमेदवारी देण्यात आली आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांना तामीळनाडूमधून उमेदवारी दिली असून द्रमूकने आपल्या कोट्यातील एक जागा काँग्रेसला देण्याचे मान्य केले होते.
हेही वाचा : कपिल सिब्बल यांचा राजीनामा: जी-२३ या काँग्रेसमधील नाराज नेत्यांच्या गटाला मोठा धक्का
चिदम्बरम यांची सहा वर्षांची मुदत संपत असून ते महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेले होते. काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक, जुनेजाणते प्रमोद तिवारी या दोघांनाही राजस्थानातून राज्यसभेसाठी संधी देण्यात आली आहे. मध्य प्रदेशमधून विवेक तन्खा हे पुन्हा राज्यसभेत जाऊ शकतील. छत्तीसगढमधून राजीव शुक्ला व रंजीत रंजन यांना उमेदवारी दिली गेली आहे. रंजीत रजन या गेल्या लोकसभेत काँग्रेसच्या सदस्य होत्या.