राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे यांची टीका; दरवर्षी दोन कोटी रोजगाराचा दावा फोल
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, मग आतापर्यंत १५ कोटी लोकांना नोकऱ्या मिळायला हव्या होत्या. तुम्ही (केंद्र सरकार) प्रत्यक्षात किती रोजगार निर्माण केले? यंदाच्या अर्थसंकल्पात तर पाच वर्षांत ६० लाख नोकऱ्या दिल्या जातील, असे म्हटले आहे, अशा शब्दांत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी केंद्र सरकारच्या अनेक दाव्यांचे वाभाडे काढले.
संसदेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर बुधवारी चर्चा सुरू झाली. दोन्ही सदनांमध्ये १२ तासांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून त्यानंतर ७ व ८ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी अनुक्रमे लोकसभेत व राज्यसभेत चर्चेला उत्तर देतील. राज्यसभेत अभिभाषणावरील चर्चेत खरगेंनी एक तासाहून अधिक वेळ घणाघाती भाषण केले. खरगेंचे संपूर्ण भाषण संपेपर्यंत मोदी वरिष्ठ सभागृहात उपस्थित होते. लखीमपूर हत्याकांडाच्या चौकशीवर मंत्रिपदावर बसलेली व्यक्ती प्रभाव टाकू शकतो, हे लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा यांचा राजीनामा तात्काळ घ्यायला हवा होता; पण उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीकडे बघून तुम्ही गप्प बसला आहात, अशी टीका खरगे यांनी मोदींवर केली.
तारले त्यांना मारले!
‘राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे बहुधा अखेरचे अभिभाषण असेल. ते गरीब घरातून आले आहेत, त्यांना अनुसूचित जातींबद्दल कणव आहे, पण या समाजघटकांबद्दल, शेतकऱ्यांबद्दल, महागाई-बेरोजगारीबद्दल अभिभाषणात उल्लेखही नाही,’ असे खरगे म्हणाले. २०२१ मध्ये १२ वर्षांतील सर्वाधिक १४.२७ टक्के चलनवाढ नोंदवली गेली. पेट्रोल-डिझेलचे दर ३० टक्क्यांनी वाढले. त्यातून २५ लाख कोटी मिळवले, ते गेले कुठे? दुसऱ्या बाजूला उत्पन्नातील विषमता कैकपटीने वाढली. तळातील ५० टक्के लोकांचे उत्पन्न १३ टक्के, तर ४० टक्के मध्यमवर्गीयांचे उत्पन्न ३० टक्के आहे. वरच्या स्तरातील १० टक्के श्रीमंतांचे उत्पन्न मात्र ५७ टक्के आहे. तुम्ही ‘मनरेगा’ला ‘यूपीए’च्या फोल धोरणाचे स्मारक म्हणून हिणवले होते, त्याच योजनेने करोना काळात लोकांना तारले. किमान वेतन २३५ रुपये द्यायला हवे होते, ते मिळत नाही. अगदी २०० रुपये दिले जातात असे मानले तरी, ‘मनरेगा’वरील अर्थसंकल्पीय तरतूद १ लाख ८० हजार कोटी असायला हवी, पण फक्त ७३ हजार कोटी दिले आहेत, असा विरोधाभास खरगेंनी मांडला.
‘तुम्ही जिवंत नसता’
‘७० वर्षांत काय केले, असे सातत्याने आम्हाला (काँग्रेसला) विचारत असता. आम्ही काही केले नसते तर तुम्ही जिवंत राहिला नसता. काँग्रेसमुळे देशात लोकशाही आली, संविधान निर्माण झाले. म्हणून तुम्हाला सत्ता मिळाली, पदे मिळाली,’ अशी प्रखर टीका खरगेंनी केल्यामुळे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी, मुख्तार अब्बास नक्वी आदी मंत्र्यांनी विरोध करून त्यांना प्रतिवाद केला. आयआयएम, आयआयटी, एम्स अशा अनेक मूलभूत कार्य करणाऱ्या संस्थांचे झाड काँग्रेसने लावले. त्याचे श्रेय तुम्ही घेत आहात. नेहरूंबद्दल तुम्हाला द्वेष वाटतो, पण त्यांच्या काळात संस्थात्मक पाया रचला गेला, असे प्रत्युत्तर खरगेंनी दिले.
आत्मनिर्भरता की चीननिर्भरता?
डोळे लाल करून चीनला सज्जड इशारा द्या, असे तुम्हीच (मोदी) यूपीए सरकारला सांगितले होते. आता तुमचे डोळे लाल का होत नाहीत? चीनने घुसखोरी केली, तो घरे बांधतोय, पण तुम्ही मात्र मौन बाळगून आहात, चीन आयात वाढवत आहात. २००३ मध्ये चिनी आयात ३.८ लाख कोटी रुपये होती, २०२१ मध्ये ती ७ लाख कोटींवर गेली आहे. निर्यात-आयातीतील तूट २.७ लाख कोटींवरून ५.२५ लाख कोटींवर गेली आहे. ही तुमची आत्मनिर्भरता की चिनीनिर्भरता, असा सवाल खरगे यांनी उपस्थित केला.