जयपूर : ‘इन्व्हेस्ट राजस्थान’ सोहळय़ात उद्योगपती गौतम अदानी यांची प्रशंसा केल्याबद्दल भाजपने काँग्रेसची खिल्ली उडवली होती. भाजपला प्रत्युत्तर देताना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शनिवारी स्पष्ट केले, की हा खासगी कार्यक्रम नव्हता. त्याला तीन हजार प्रतिनिधी उपस्थित होते. राजस्थानला गुंतवणूक व रोजगार हवा आहे. मग त्यासाठी गौतम अदानी-अंबानी असो की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा असो.. आम्ही त्याचे स्वागत करू.
‘इन्व्हेस्ट राजस्थान’ हा खासगी कार्यक्रम नसून ते गुंतवणूकदारांचे संमेलन होते. काँग्रेसच्या प्रतिनिधींचे नव्हते. या वेळी उपस्थित राहणाऱ्या प्रतिनिधींची विचारधारा काँग्रेस किंवा भाजपची असू शकते, असे सांगून गेहलोत म्हणाले, की विरोधक जाणून बुजून अडथळे निर्माण करत आहेत. मी त्यांचा निषेध करतो. अदानींना लक्ष्य करत राहुल गांधी पंतप्रधान मोदी केवळ बडय़ा उद्योगपतींनाच मदत करतात, असा आरोप अनेकदा करतात. तर, गेहलोत यांनी अदानींना गौतम भाई असे संबोधून, जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले होते.