पीटीआय, नवी दिल्ली
अदानी समूहाचे संस्थापक-अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर लाचखोरीचे आरोप नसल्याचा खुलासा अदानी समूहाकडून बुधवारी करण्यात आला. त्यांच्यावर ‘वायर घोटाळा’ केल्याचा आरोप असल्याचे समूहाकडून सांगण्यात आले. या गुन्ह्यांसाठी अमेरिकेत आर्थिक दंड ठोठावण्याची तरतूद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अमेरिकेच्या न्याय मंत्रालयाने मागील आठवड्यात न्यूयॉर्क न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये गौतम अदानी, त्यांचे पुतणे सागर अदानी किंवा विनीत जैन यांचे नाव ‘फॉरेन करप्ट प्रॅक्टिस अॅक्ट’चे (विदेशी भ्रष्ट व्यवहार कायदा) उल्लंघनाशी संबंधित एकदाही नसल्याचे अदानी समूहाच्या ‘अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड’ने (एजीईएल) बाजारमंचाकडे उघड केलेल्या माहितीमध्ये नमूद केले आहे. लाचखोरीच्या आरोपांमध्ये ‘एजीईएल’च्या तीन कार्यकारी अधिकाऱ्यांची नावे आहेत. मात्र, त्यांच्याविरोधात केवळ सुरक्षा घोटाळा कट, वायर घोटाळा कट आणि सुरक्षा घोटाळा हे आरोप ठेवण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. सामान्यपणे अशा प्रकारचे गुन्हे लाचखोरीपेक्षा कमी गंभीर मानले जातात.
हेही वाचा >>>Iskcon : “इस्कॉन ही कट्टरपंथी संघटना…”, बांगलादेश सरकारचे उत्तर; बंदीच्या मागणीवर उच्च न्यायालयात नेमकं काय घडलं?
अमेरिकी नियमांनुसार ‘वायर घोटाळा’ म्हणजे इतरांना पैसे किंवा संवेदनशील माहिती पाठवण्यासाठी सुरक्षा आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करणे. गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्याविरोधात ‘सिक्युरिटीज अॅक्ट’च्या कलमांचे उल्लंघन केल्याची आणि अदानी ग्रीन कंपनीला कायद्याचे उल्लंघन करण्यास मदत केल्याची दिवाणी तक्रार दाखल करण्यात आल्याचे ‘एजीईएल’ने बाजारमंचाला सांगितले.
एफसीपीएची तरतूद
अमेरिकेच्या ‘फॉरेन करप्ट प्रॅक्टिस अॅक्ट’नुसार (एफसीपीए) सूचिबद्ध कंपन्या, अमेरिकी गुंतवणूकदार किंवा संयुक्त उपक्रम यासारख्या अमेरिकेशी संबंधित कंपन्यांनी किंवा व्यक्तींनी वशिलेबाजीसाठी दुसऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना पैसे अथवा अन्य काही मौल्यवान वस्तू देणे किंवा देऊ करणे हा गुन्हा आहे. अदानी समूहाची कोणतीही कंपनी अमेरिकेत व्यापार करत नाही, मात्र त्यांच्या ‘एजीईएल’सारख्या कंपन्यांमध्ये अमेरिकी गुंतवणूकदारांनी समभाग किंवा कर्जाच्या स्वरूपात गुंतवणूक केली आहे.
हेही वाचा >>>Actor Dashan : “तो समाजासाठी घातक होता, म्हणून त्याची हत्या केली”; अभिनेता दर्शनची उच्च न्यायालयात धक्कादायक माहिती
ट्रम्प प्रशासनाकडून अदानींना अभय?
अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २० जानेवारीला अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गौतम अदानी यांच्याविरोधातील गुन्हे मागे घेतले जाणे शक्य आहे, अशी माहिती अमेरिकेतील भारतीय वंशाचे अभियोक्ते रवी बात्रा यांनी दिली. नवीन प्रशासनाला अदानींविरोधातील २६५ दशलक्ष डॉलरच्या लाचखोरीच्या आरोपांमध्ये तथ्य नाही असे वाटले किंवा ते बिनमहत्त्वाचे वाटले तर ते मागे घेतले जातील, असे बात्रा यांनी सांगितले. गौतम अदानी अमेरिकेचे रहिवासी नसल्यामुळे त्यांच्याविरोधात करण्यात आलेल्या लाचखोरीच्या आरोपांमुळे अमेरिकी कायदा अमेरिकेबाहेर लागू होतो का, हा प्रश्नही उपस्थित होत असल्याचे बात्रा यांनी सांगितले.
अमेरिकेचे न्याय मंत्रालयाचे आरोपपत्र किंवा अमेरिकेच्या ‘सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन’कडे करण्यात आलेल्या दिवाणी तक्रारीमध्ये गौतम अदानी, सागर अदानी किंवा विनीत जैन यांनी एफसीपीएचे उल्लंघन केल्याचा कोणताही आरोप ठेवण्यात आलेला नाही. तीन संचालकांवर सुरक्षा घोटाळा कट, वायर घोटाळा कट आणि सुरक्षा घोटाळा हे अन्य तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.- अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड