न्यूयॉर्क : अदानी समूहाचे प्रमुख आणि प्रसिद्ध उद्याोजक गौतम अदानी यांच्याविरोधात न्यूयॉर्कमध्ये अटक वॉरंट लागू करण्यात आले आहे. त्यामुळे अदानी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अदानी यांची चौकशी करण्यासाठी त्यांचे भारतातून अमेरिकेत प्रत्यार्पण केले जाऊ शकते, अशी माहिती अमेरिकी कायदेतज्ज्ञांनी दिली. अमेरिकी गुंतवणूकदारांची फसवणूक करून भ्रष्टाचार केल्याचाही ठपका अदानींवर ठेवण्यात आला आहे.
सौरऊर्जा खरेदी करण्यासाठी आंध्र प्रदेश आणि ओडिशामधील अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप अमेरिकेच्या न्याय विभागाने नुकताच गौतम अदानी, त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्यासह सात जणांवर केला. मात्र यामध्ये अधिकाऱ्यांची नावे उघड करण्यात आलेली नाहीत. कोट्यवधी डॉलरच्या लाचखोरी प्रकरणात अमेरिकेत दिवाणी आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकल्पांमुळे २० वर्षांमध्ये अदानी उद्याोग समूहाला २०० कोटींपेक्षा जास्त नफा मिळण्याची अपेक्षा आहे. अदानी समूहाने मात्र हे आरोप फेटाळले असून, अमेरिकन वकिलांनी केलेले आरोप निराधार आहेत आणि समूह ‘सर्व कायद्यांचे पालन करतो’ असे म्हटले आहे.
द्विपक्षीय करारानुसार अधिकार
अदानी आणि अन्य सात जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्याचा आणि ते राहत असलेल्या राष्ट्रांमध्ये त्यांची सेवा करण्याचा अधिकार यूएस अॅटर्नी ब्रियन पीस यांना आहे, अशी माहिती भारतीय अमेरिकन वकील बत्रा यांनी दिली. दोन्ही देशांचा प्रत्यार्पण करार असेल तर द्विपक्षीय करारानुसार मूळ देशाने प्रत्यार्पण केलेल्या व्यक्तीला अमेरिकेकडे सोपवायला हवे. ही एक प्रक्रिया असून मूळ देशाने कायद्यानुसार पाळली पाहिजे, असे ते म्हणाले. भारत-अमेरिका प्रत्यार्पण करार १९९७ मध्ये झाला होता.
हेही वाचा >>> WhatsApp वरचा एक न वाचलेला मेसेज, दिल्लीतल्या विवाहितेची लंडनमध्ये झालेली हत्या कशी उलगडली? काय आहे प्रकरण?
पाच गुन्हे दाखल
न्यूयॉर्क पूर्व जिल्ह्याचे वकील पीस यांनी अदानी, त्यांचा पुतण्या सागर (समूहाच्या अक्षय ऊर्जा शाखा अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे कार्यकारी संचालक) आणि त्यांचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत एस यांच्याविरोधात पाच गुन्ह्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. अब्जावधी डॉलरच्या योजनेत निधी मिळविण्यासाठी दिशाभूल करून गुंतवणूकदार आणि जागतिक वित्तीय संस्थांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अझूर पॉवर ग्लोबलचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि रणजीत गुप्ता, रुपेश अग्रवाल, सिरिल कॅबनेसचे सौरभ अग्रवाल आणि दीपक मल्होत्रा यांच्यावर परदेशी कायद्याच्या उल्लंघनाचे आरोप करण्यात आले आहेत.