एक्सप्रेस वृत्त
नवी दिल्ली : उद्योगपती गौतम अदानी यांच्या मालकीच्या ‘अदानी ग्रीन एनर्जी’ने श्रीलंकेतील तब्बल १ अब्ज डॉलर गुंतवणुकीचा पवनऊर्जा प्रकल्प रद्द करत असल्याची घोषणा गुरुवारी केली. तेथे नव्याने आलेल्या सरकारने शुल्कांची फेररचना करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कंपनीने हे पाऊल उचलले. तब्बल ४८४ मेगावॉट ऊर्जानिर्मिती आणि ग्राहकांपर्यंत वितरणाचा हा प्रकल्प होता.

श्रीलंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी वीजबिले कमी करण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाच्या अटींवर पुन्हा वाटाघाटी करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेतील दोन अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प आणि वितरण प्रकल्पामधून माघार घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याचे कंपनीने निवेदनात म्हटले आहे. ‘आमच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच सीईबीच्या (सिलोन इलेक्ट्रिसिटी बोर्ड) अधिकाऱ्यांशी आणि कोलंबोमधील मंत्रालयाशी चर्चा केली. त्यानंतर वाटाघाटींसाठी आणखी एक मंत्रिमंळ नियुक्त समिती आणि प्रकल्प समिती स्थापन केली जाईल, असे सांगण्यात आले. या पैलूवर संचालक मंडळाच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला असून श्रीलंका व त्या देशाच्या सार्वभौम अधिकारांचा आदर करून सदर प्रकल्पातून आदरपूर्वक माघार घेईल,’ असे अदानी ग्रीनने बोर्ड ऑफ इन्व्हेस्टमेंटचे अध्यक्ष अर्जुन हेरथ यांना लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. असे असले तरी कोलंबो बंदरावरील टर्मिनल उभारणीत ७०० दशलक्ष डॉलरची अदानी समूहाची गुंतवणूक कायम राहणार आहे.

Story img Loader