हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेचा अहवाल आल्यानंतर उद्योजक गौतम अदाणी यांना खूप मोठा झटका बसला. विरोधकांनी अदाणी प्रकरणावरुन संसदेत गोंधळ घातला. संयुक्त संसदीय समिती स्थापन करुन चौकशी करण्याची मागणी केली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा आणि राज्यसभेत केलेल्या भाषणांमध्ये अदाणी प्रकरणावर एकही शब्द उच्चारला नाही. भारतातील उद्योगजगतही यावर काहीच बोललेलं दिसलं नाही. आता मात्र अमेरिकेचे अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांनी अदाणी समूहाच्या प्रकरणावरुन मोदींवर निशाणा साधला आहे. सोरोस म्हणाले, “मोदी अदाणी प्रकरणावर मौन बाळगून आहेत. पण परदेशी गुंतवणूकदार आणि संसदेला त्यांना उत्तर द्यावेच लागेल.”
कोण आहेत जॉर्ज सोरोस?
जर्मनी येथे होत असलेल्या म्युनिक सुरक्षा संमेलनाच्या आधी जॉर्ज सोरोस यांनी म्युनिक विद्यापीठात एका कार्यक्रमात बोलत असताना सदर वक्तव्य केलेलं आहे. तसेच गौतम अदाणी यांच्या अदाणी समूहाने शेअर मार्केटला वेठीस धरल्यामुळे भारताच्या विश्वासार्हतेला कसा तडा गेला? यावरही भाष्य केले. जॉर्ज सोरोस हे ओपन सोसायटी फाऊंडेशन या संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांची संपत्ती ८.५ अब्ज डॉलर्स एवढी आहे. लोकशाहीवादी, पारदर्शकतेला प्राधान्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या गटांना ते निधी पुरवत असतात.
हे वाचा >> हिंडेनबर्गनंतर ‘अदाणी’ला आणखी एक मोठा झटका; फ्रान्ससोबतचा ५० अब्ज डॉलर्सचा करार स्थगित!
मोदींची सरकारवरील पकड कमकुवत होईल
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भांडवलदारांना झुकते माप देत असल्याचा आरोपही जॉर्ज सोरोस यांनी केला. त्यांनी सांगितले की, मोदी आणि अदाणी यांचे चांगले संबंध आहेत. यामुळे भारतात मोदींची सरकारवरील पकड नक्कीच कमकुवत होईल. तसेच संस्थात्मक सुधारणांसाठी हे प्रकरण एक नवे दालन उघडू शकते. मी कदाचित भोळा असू शकतो पण हे प्रकरण भारतात लोकशाहीला आणखी बळकट करु शकेल, अशी अपेक्षा जॉर्ज यांनी यावेळी व्यक्त केली.
हे वाचा >> अदाणी-हिंडेनबर्ग प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
२४ जानेवारी रोजी हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेचा अहवाल बाहेर आला. त्यामध्ये अदाणी समूहावार शेअर्सच्या किंमतीमध्ये फेरफार करुन गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यामुळे अदाणी समुहाचे बाजारमूल्य १२० अब्ज डॉलरने खाली आले. तसेच जागतिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या गौतम अदाणींना पायउतार व्हावे लागले होते. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदाणी संबंधावर अनेकांनी प्रकाश टाकला. विरोधक गौतम अदाणी यांची गेल्या काही वर्षातील प्रगतीला पंतप्रधान मोदी यांचा वरदहस्त कारणीभूत असल्याचे सांगत आहेत. मात्र मोदींनी या विषयावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.