करोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. तसेच, नव्या करोनाबाधितांची संख्या देखील घटू लागल्याचं गेल्या काही दिवसांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. मात्र, आता तिसऱ्या लाटेची टांगती तलवार डोक्यावर आहे. त्यात व्यापक लसीकरणाची मोहीम जरी हाती घेण्यात आली असली, तरी अजूनही दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत फार कमी आहे. काही राज्यांकडून लसींचा पुरवठा अपुरा होत असल्याच्या देखील तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात सर्वाधिक लसींचा पुरवठा करणाऱ्या सिरम इन्स्टिट्युटनं लसींचा हाच पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. देशातील आघाडीच्या शॉट कायशा या कंपनीची ५० टक्के मालकी अर्थात ५० टक्के शेअर्स सिरम इन्स्टिट्युटनं खरेदी केले आहेत.
Adar Poonawalla यांची ट्विटरवर घोषणा!
सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भातली माहिती दिली असून दोन्ही कंपन्यांकडून जारी करण्यात आलेलं पत्रकच अदर पूनावाला यांनी आपल्या ट्वीटसोबत शेअर केलं आहे. “देशातील लस उत्पादक उद्योगांसाठी कच्च्या मालाच्या बाबतीत आत्मनिर्भर होणं फार आवश्यक आहे. हेच साध्य करण्यासाठी सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियानं शॉट कायशामधील ५० टक्के समभाग खरेदी केले आहेत. भारतीय लस उद्योग विश्वासाठी औषध पॅकेजिंग उत्पादनांचा अखंड पुरवठा होणं यामुळे शक्य होणार आहे”, असं अदर पूनावाला यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
It is important for the vaccine industry to be self-reliant for its raw materials #AtmanirbharBharat. With this in mind, @SerumInstIndia has acquired 50% stake in SCHOTT Kaisha to ensure uninterrupted supply of essential pharma packaging products for the Indian vaccine industry. pic.twitter.com/Lx81l70RT9
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) August 17, 2021
काय करते शॉट कायशा कंपनी?
Schott Kaisha ही फार्मा पॅकेजिंग क्षेत्रातली भारतामधील महत्त्वाची कंपनी आहे. Schott AG ही जर्मनीमधील काच उत्पादक कंपनी आणि कायशा ही भारतातील कंपनी यांच्या भागीदारीतून शॉट कायशा या कंपनीची निर्मिती झाली आहे. देशभरात सर्वाधिक २.५ बिलियन व्हायल्स प्रतिवर्षी ही कंपनी उत्पादित करते. या वर्षभरात तब्बल ३८० मिलियन व्हायल्सची विक्री करण्याचं लक्ष्य कंपनीने ठेवल्याचं सांगण्यात आलं आहे. गेल्या वर्षी हा आकडा ११३ मिलियन वायल्स इतका होता.
…म्हणून Covishield चा तिसरा डोस घ्यावाच लागणार; सायरस पूनावालांनी सांगितलं कारण
नेमका करार किती रकमेचा झाला?
दरम्यान, अदर पूनावाला किंवा शॉट कायशा यांनी हा करार नेमका किती रक्कमेचा झालाय, याविषयी त्यांच्या संयुक्त पत्रकामध्ये माहिती दिलेली नाही. दोन्ही कंपन्यांनी कराराच्या एकूण रकमेचा आकडा जाहीर न करण्याचा निर्णय घेतल्याचं शॉट इंडियाच्या प्रतिनिधीने रॉयटर्सला पाठवलेल्या मेलमध्ये म्हटलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सिरम इस्टिट्युट शॉट कायशाकडून औषधांच्या पॅकिंगसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची खरेदी करत आहे. यामध्ये लसींच्या साठवणुकीसाठी लागणाऱ्या व्हायल्स आणि सिरींजचा समावेश आहे.